उड्डाणपूल बांधकामात अडथळ्यांची शर्यत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2020 05:00 AM2020-08-11T05:00:00+5:302020-08-11T05:00:24+5:30

बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाची जीर्ण अवस्था झाली होती. पुलावर हजारावर खड्ड्यांनी जाळे विणले होते. अरुंद पूल रहदारीकरिता अडचणीचाच ठरत होता. याच पुलावरून हिंगणघाट, आणि यवतमाळ, वर्ध्याकडे जाणाऱ्या वाहतुकीची सातत्याने वर्दळ असते. परिणामी, अरुंद पुलामुळे नेहमीच वाहतूक ठप्प पडत होती. वाहनधारकांना तासन्तास पुलावरच अडकून पडावे लागत होते.

Race for obstacles in flyover construction | उड्डाणपूल बांधकामात अडथळ्यांची शर्यत

उड्डाणपूल बांधकामात अडथळ्यांची शर्यत

Next
ठळक मुद्देआधी लॉकडाऊन, आता रेल्वेने बदलविले डिझाईन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : बजाज चौकातील उड्डाणपुलाच्या बांधकामात अगोदर कोरोना लॉकडाऊनने, तर आता रेल्वेने आपल्या हद्दीत पुलाचे डिझाईन बदलविल्याने खोडा निर्माण झाल्याचे चित्र आहे.
बजाज चौकातील आचार्य विनोबा भावे उड्डाणपुलाची जीर्ण अवस्था झाली होती. पुलावर हजारावर खड्ड्यांनी जाळे विणले होते. अरुंद पूल रहदारीकरिता अडचणीचाच ठरत होता. याच पुलावरून हिंगणघाट, आणि यवतमाळ, वर्ध्याकडे जाणाऱ्या वाहतुकीची सातत्याने वर्दळ असते. परिणामी, अरुंद पुलामुळे नेहमीच वाहतूक ठप्प पडत होती. वाहनधारकांना तासन्तास पुलावरच अडकून पडावे लागत होते. वेळोवेळी मागणीनंतर पुलाच्या बांधकामाला मंजुरी मिळाली. २९ कोटी रुपयांचा निधी पूल बांधकामाकरिता मंजूर झाला. या पुलाचे दोन-तीन वर्षांपूर्वी बांधकाम सुरू झाले. काम गतीने सुरू असतानाच मार्च महिन्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देशभरासह राज्यात लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे काम बंद पडले. दरम्यानच्या काळात मजूरवर्गही स्वगावी गेल्याने काम आणखीच रेंगाळले.
जून महिन्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर शासनाने शसकीय आणि खासगी बांधकामांना परवानगी दिली. आचार्य विनोबा भावे यांच्या नावे ओळखल्या जाणारा हा उड्डाणपूल रेल्वे विभागाच्या अखत्यारित येतो.
सद्यस्थितीत पुलाचे ३० ते ४० टक्के काम झाले आहे. आता मध्येच रेल्वेने उड्डाणपुलाचे डिझाईन बदलविण्याचा निर्णय घेतला. रेल्वेच्या हद्दीत मध्यभागात उड्डाणपुलाचे डिझाईन बदलले आहे.
त्यामुळे पुलाची इतर बारीकसारीक कामे उरकविली जात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली. रेल्वेने पुलाचे संपूर्ण डिझाईनच बदलल्यास कामाला आणखी विलंब लागण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सध्यातरी नागरिकांना वाहतुककोंडीचा सामना करावा लागणार आहे.

उड्डाणपुलावर मेगाब्लॉक नित्याचा
वर्धा शहराला जोडणारा आचार्य विनोबा भावे उड्डाणपूल अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मात्र, गत काही वर्षांपासून पुलाची दुर्दशा झालेली आहे. हिंगणघाट, यवतमाळकडे याच उड्डाणपुलावरून वाहतूक होते. उड्डाणपूल आधीच अरुंद त्यातच वाहनांच्या वाढत्या संख्येचा भार यामुळे उड्डाणपुलावर सातत्याने वाहतुककोंडी होत होती. यामुळेच पूल बांधकामाची मागणी झाली आणि कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध झाला आहे.

Web Title: Race for obstacles in flyover construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.