लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा (घाडगे): जिल्ह्यातील १०४ सार्वजनिक वाचनालये आहेत. पण, नियमित अनुदानाचा दुसरा हप्तासुद्धा अद्याप मिळाला नाही. ३१ मार्चपूर्वी कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचे, पुस्तक खरेदी व इतर महत्त्वाचे व्यवहार कसे करायचे, हा नित्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे. तसेच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना गत ६ महिन्यांपासून वेतन मिळले नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे.
शासनाच्या इतर कोणत्याही योजनेमध्ये स्किल लेबरला किमान १ हजार रुपये रोज, तर अकुशल कामगाराला मिळतो, तर किमान ५०० रुपये रोजचा मिळतो. सेवाभावी काम करणाऱ्या जिल्हा अ ग्रंथालयाच्या ग्रंथपालला मिळतात ५६० रुपये, तर लिपीकला २४० रुपये रोजी मिळते. तालुका अ आणि जिल्हा ब वाचनालयाच्या ग्रंथपालला ४०० रुपये मिळतात तर लिपीकला २०२ रुपये रोज मिळतो. तालुका ब वर्गाच्या ग्रंथपालला ३८९ रुपये, तर लिपीकला २०२ रुपये रोज मिळतो. तालुका क दर्जाच्या ग्रंथपाल यांना २४० रुपये मिळतात. त्यामुळे त्यांना पहिलेच आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशातच गत सहा महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचे वेतनच झाले नाही. त्यामुळे कर्मचारी हवालदिल झाले आहे. लवकरात लवकर पगार करण्याची मागणी कर्मचारी वर्गातून होत आहे.
कसे व केव्हा मिळते ग्रंथालयांना अनुदानशासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अत्यल्प अनुदान दिले जात असून, तेही दोन टप्प्यात मिळते. अनुदानाचा पहिला ५० टक्के रकमेचा हप्ता ३० सप्टेंबरपर्यंत वाचनालयाचा वार्षिक अहवाल दिल्यानंतर मिळतो, तर ५० टक्के रकमेचा दुसरा हप्ता मार्च महिन्याच्या २० तारखेपर्यंत ऑडिट रिपोर्ट सादर केल्यानंतर मिळावा, असा शासन आदेश आहे, पण, गत १० वर्षात हा अनुदानाचा दुसरा हप्ता २० मार्चपूर्वी कधीच मिळाला नाही. ही रक्कम उसनवारी दाखवून ३१ मार्चपर्यंत खर्च करावा लागतो. उसनवारी घेतली नाही आणि खर्च केला नाही तर मंजूर अनुदान मिळत नाही. यावर्षीसुध्दा २६ मार्च उलटला. वर्ष संपायला ४ दिवस राहिले. पण, अनुदानाचा दुसरा हप्ता बँकेत जमा झाला नाही. उरलेल्या चार दिवसांपैकी ३० व ३१ मार्चला बँकेला सुटी आहे.
अधिवेशनात ठेवले अनेक मुद्देयांचा महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात जिल्ह्यात सार्वजनिक वाचनालय संदर्भात मोठे अधिवेशन घेण्यात आले होते. त्या अधिवेशात विविध मान्यवरांनी अनेक विषयावर चर्चा केली.
वाचनालयांना वर्गवारीनुसार किती मिळते वार्षिक अनुदानवाचनालयातील पुस्तक संख्या, साधन सामुग्री आणि कर्मचारी संख्या यानुसार वाचनालयाचे एकूण ९ वर्ग (दर्जा) आहेत. सण २०२२-२३मध्ये झालेल्या ६० टक्के वाढीनुसार जिल्हा अ ग्रंथालयाला ११ लाख ५२ हजार, तालुका अला ६ लाख १४ हजार ४००, इतर अ ला ४ लाख ६० हजार ८००, जिल्हा ब ला ६ लाख १४ हजार ४००, तालुका ब ला ४ लाख ६० हजार ८०० इतर ब ला ३ लाख ७ हजार २००, तालुका क ला २ लाख ३० हजार ४००, इतर क ला १ लाख ५३ हजार ६००, तर ड वर्ग ग्रंथालयाला फक्त ४८ हजार रुपये मिळतात. परंतु, गेले अनेक दिवस झाले सार्वजनिक वाचनालयाला सरकारकडून निधी दिला गेला नाही. त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे पुस्तके घेण्यासाठी कर्मचाऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे.