लोकमत न्यूज नेटवर्क पुलगाव : परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना व त्यानंतर तेथे झालेल्या आंदोलनासंदर्भात अटक करण्यात आलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलिस कोठडीत झालेला मृत्यू, या घटनेच्या निषेधार्थ बुधवारी भीम अनुयायांच्यावतीने पुलगावात बंद पुकारण्यात आला होता. या बंदला व्यापाऱ्यांकडून शतप्रतिशत प्रतिसाद देत प्रतिष्ठाने बंद ठेवली. शहरातील मुख्य मार्गाने मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन पोलिसांना देण्यात आले.
परभणी येथे संविधान प्रतिकृतीची विटंबना समाजकंटकाकडून करण्यात आली. त्यानंतर झालेल्या आंदोलनात पोलिसांकडून धरपडक करण्यात आली. यात गुन्हा नसताना सोमनाथ सूर्यवशी यांना अटक करून अमानुष मारहाण करण्यात आली. यात त्यांचा पोलिस कोठडीत असतानाच मृत्यू झाला. या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी तसेच दोषींवर कठोर कारवाईसाठी भीम अनुयायांकडून बुधवारी पुलगावात मोर्चा काढून कारवाईची मागणी केली.
शहरात शुकशुकाट... सर्व व्यावसायिक प्रतिष्ठान, शाळा, महाविद्यालयांकडून उत्स्फूर्त बंद पाळला. दुपारी महिला, पुरुष, युवकांनी मोर्चा काढून शहरातील मुख्य मार्गाने जाऊन तहसील व पोलिस स्टेशन येथे निवेदन दिले. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय द्यावा तसेच त्याच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या दोषी अधिकारी व पोलिस कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली.