वर्धा : शासनाने जाहीर केलेली मानधन वाढ अद्याप दिली नाही. शिवाय दिवाळीची भाऊबिजही दिली नाही. यामुळे संतप्त झालेल्या अंगणवाडी सेविकांनी शुक्रवारपासून शासनाच्या इतर कामावर बहिष्कार टाकत काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला. यानुसार सर्वच अंगणवाडी केंद्रांमध्ये सेविका काळ्या फिती लावून काम करीत असल्याचे दिसून येत होते़अंगणवाडी सेविकांना त्यांच्या समस्या सोडविण्याकरिता आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागत असल्याचे वास्तव आहे. याच आंदोलनाच्या शस्त्राचा वापर करून त्यांनी मानधन वाढीची मागणी मान्य करून घेतली होती. त्यांची मागणी मान्य झाली तरी त्यांना प्रत्यक्षात वाढीव मानधन मिळाले नाही. वाढीव मानधन मिळण्याकरिता पुन्हा लढा देण्याची वेळ त्यांच्यावर आली. याकरिता अंगणवाडी सेविकांकरिता कार्यरत असलेल्या संघटनांच्यावतीने लढा सुरूच आहे; पण शासनाच्यावतीने त्यांना देण्यात येत असलेल्या मानधनावरच गदा येत असल्याचे समोर येत आहे. अंगणवाडी सेविकांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत राज्यात व केंद्रात काँग्रेसची सत्ता असताना अंगणवाडी सेविकांच्या मानधनात एप्रिल २०१४ पासून वाढ करण्यात आली होती. मानधनात झालेली वाढ त्यांना वर्ष लोटत आले तरी मिळाली नाही. वाढलेले मानधन मिळावे याकरिता त्यांच्यावतीने लढा सुरूच आहे. असे असताना शासनाने घेतलेला पहिल्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यास आता नवे सरकार कुचराई करीत असल्याचे समोर येत आहे. वाढ झालेले मानधन अंगणवाडी सेविकांना एप्रिल २०१५ पासून देण्याचे जाहीर केले. यामुळे वर्षापुर्वी घेतलेला निर्णय हवेतच विरल्याचे दिसून आले आहे. अंगणवाडी सेविकांच्याबाबतीत शासनाच्यावतीने सुरू असलेल्या या धोरणाचा निषेध नोंदवित त्याच्याकरीत कार्य करणाऱ्या सात संघटनांनी एकत्र येत शासनाच्या या प्रकाराचा निषेध नोंदविण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीच्या कामाव्यतिरिक्त दुसरे काम करण्यास नकार दिला आहे. या सेविकांनी आजपासून काळ्या फिती लावून काम करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावरून सेविका शासनाच्या बैठकी व इतर अहवालाचे काम करण्यास नकार दिला. त्यांनी शासनाची इतर कामे व बैठकी करण्यास नकार दिल्याने शासनाच्या कामांचा खोळंबा होईल अशी माहिती संघटनेचे उटाने यांनी दिली. यात पुन्हा दोन दिवसीय आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अंगणवाडी सेविकांचे निषेध आंदोलन
By admin | Updated: March 14, 2015 02:05 IST