गांधी आश्रमातील ऐतिहासिक स्मारकांना झांज्या अन् ताटव्यांचे संरक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2022 05:00 AM2022-06-02T05:00:00+5:302022-06-02T05:00:20+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्यांकडे चला, असा संदेश दिला. जमनलाल बजाज यांच्या विनंतीनंतर सन १९३६ मध्ये महात्मा गांधी वर्ध्याला आलेत. त्यांनी तत्कालीन सेगावात आश्रम करण्याचे निश्चित केले. याच ठिकाणाहून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र वर्धा राहिले. सेवाग्राम आश्रमात राहून महात्मा गांधी यांनी अनेक रचनात्मक कार्य केलेत. त्यामुळे या आश्रमातील विविध स्मारके महत्त्वपूर्ण असून, त्याचे संवर्धन आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने केले जाते.

Protection of historical monuments at Gandhi Ashram | गांधी आश्रमातील ऐतिहासिक स्मारकांना झांज्या अन् ताटव्यांचे संरक्षण

गांधी आश्रमातील ऐतिहासिक स्मारकांना झांज्या अन् ताटव्यांचे संरक्षण

Next

दिलीप चव्हाण
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : येथील गांधी आश्रम जगासाठी प्रेरणादायक असल्याने येथील विविध ऐतिहासिक वास्तू बघण्यासह गांधी विचार जाणून घेण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक सेवाग्राम येथे येतात; पण सध्याच्या विज्ञान युगात गांधी आश्रमातील याच ऐतिहासिक स्मारकांचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी झांज्या आणि ताटव्यांचा वापर होत आहे. त्यामुळे विज्ञान युगातही गांधी आश्रमात परंपरा जपली जात असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी खेड्यांकडे चला, असा संदेश दिला. जमनलाल बजाज यांच्या विनंतीनंतर सन १९३६ मध्ये महात्मा गांधी वर्ध्याला आलेत. त्यांनी तत्कालीन सेगावात आश्रम करण्याचे निश्चित केले. याच ठिकाणाहून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिशा दिली. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र वर्धा राहिले. सेवाग्राम आश्रमात राहून महात्मा गांधी यांनी अनेक रचनात्मक कार्य केलेत. त्यामुळे या आश्रमातील विविध स्मारके महत्त्वपूर्ण असून, त्याचे संवर्धन आश्रम प्रतिष्ठानच्यावतीने केले जाते. पावसाळ्याच्या दिवसांत याच मातीच्या स्मारकांना सर्वाधिक धोका राहत असल्याने त्यांचे संरक्षण करण्यासाठी झांज्या आणि ताटव्यांचा आधार घेतला जातो. ही परंपरा महात्मा गांधी हे सेवाग्राम आश्रमात असतानापासूनची असून, ती अजूनही जपली जात आहे. या आश्रमात कोविड संकट काळात पर्यटनांना बंदी घालण्यात आली होती. पण सध्या हे आश्रम खुले झाले आहे.

गांधी आश्रमातील ठेवा 
-    गांधीजींचे उपयोगातील साहित्य सेवाग्राम येथील आश्रमात पाहावयास मिळते. आश्रमाच्या परिसरातच आदी निवास, बापू कुटी, ‘बा’कुटी, आखरी निवास, महादेव कुटी, किशोर कुटी आदी ऐतिहासिक ठेवा जपण्याात आलेला आहे. या सर्वांची देखरेख सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान करते.
- महात्मा गांधींच्या स्मरणार्थ सन १९४४ साली कस्तुरबा रुग्णालयाची स्थापनाही सेवाग्राम येथे करण्यात आली. त्याचबरोबर डॉ. सुशीला नायर यांनी सन १९६९ साली महात्मा गांधी वैद्यकीय महाविद्यालय सेवाग्राम येथे सुरू केले. हे रुग्णालय आजही वर्धासह वर्धा जिल्ह्याबाहेरील नागरिकांसाठी फायद्याचे ठरत आहे.

शिंदुल्यांच्या पानोळ्या झाल्या दुर्मीळ
-    गांधी आश्रमातील विविध स्मारक मातीची आहेत. पावसाळ्यात ही स्मारके खराब होऊ नये, यासाठी दरवर्षी पावसाळ्या पूर्वी या स्मारकांना शिंदोल्यांच्या पानोळ्यांच्या झांज्या आणि बांबूचे ताटव्यांचे संरक्षण कवच चढविले जाते. सध्याच्या विज्ञान युगात विकासाच्या नावाखाली वृक्ष कत्तली केल्या जात असल्याने शिंदुल्यांच्या पानोळ्याही सहज मिळणे दुर्मीळ झाले आहे.

पुजई येथून आणल्या ५ हजार पानोळ्या
-    सध्या शिंदोल्यांची झाडे दुर्मीळ झाली असून, यंदाच्या वर्षी आश्रम प्रतिष्ठानने पुजई या गावातून शिंदोल्याच्या ५ हजार पानोळ्या आणल्या आहेत. याचाच वापर सध्या स्मारकांना सरंक्षण कवच तयार करण्यासाठी केला जात आहे.

गांधी आश्रमातील विविध स्मारकांचे पावसापासून संरक्षण व्हावे म्हणून स्मारकांना झांज्या आणि ताटव्यांचे कवच लावले जात आहे. यंदा पुजई येथून शिंदोल्यांच्या ५ हजार पानोळ्या आणण्यात आल्या असून, त्याचा वापर संरक्षण कवच तयार करण्यासाठी केला जात आहे.
- टी. आर. एन. प्रभू, अध्यक्ष, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, सेवाग्राम.

 

 

Web Title: Protection of historical monuments at Gandhi Ashram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.