संयुक्त आढावा बैठक : वर्धा शहरातील वाहतुकीच्या मुद्यांवर चर्चावर्धा : जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, वाहतूक नियंत्रण शाखा, जिल्हा परिषद, नगरपरिषद, जनहिंद मंच, यांची संयुक्त आढावा बैठक पार पाडली. सदर बैठकीमध्ये सुरळीत वाहतुकीकरिता योग्य नियोजनाची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. धुनिवाले चौक येथून बसथांबा १०० मीटर अंतरावर असूनसुद्धा बस आणि ट्रॅव्हल्स धुनिवाले चौक येथेच थांबतात. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. धुनिवाले बसथांबा येथेच बस व ट्रॅव्हल्स थांबण्याबाबत तत्काळ नियमांचे पालन करण्यात यावे व बजाज चौक, आर्वी नाका येथे सिसिटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था करणे, गरजेचे आहे. वाहतूक पथदिवे सुरू करण्यात यावे, बजाज चौक येथील पार्कींग झोन बोर्ड ठळकपणे लावण्यात यावे तसेच ठिकठिकाणी पिवळ्या रंगाचा पट्टा रस्त्यावर ठळकपणे दिसावा, अशी व्यवस्था कराण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. वाहतूक शाखा व पोलीस विभाग यांच्यातर्फे नो पार्किंग व नोएन्ट्री मध्ये येणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्यात येते. वाहन जप्तीची कार्यवाही करीत असताना अत्यंत बेजबाबदारपणे वाहनांचे नुकसान होईल याची पर्वा न करता ट्रक, मिनीट्रक द्वारे जप्तीची कार्यवाही करण्यात येते. वाहकांना पार्किंगबद्दल माहिती नसल्यामुळे नो पार्किंगच्या ठिकाणी वाहन पार्किंग केली जाते. त्यामुळे वाहनाचे नुकसान होणार नाही व जनतेला नाहक त्रास व आर्थिक भुर्दंड बसणार नाही व शहरातील विस्कळीत वाहतूक सुव्यवस्थित करण्याकरिता योग्य नियोजन करण्यात यावे, अशा सूचना खासदार तडस यांनी दिल्या.बैठकीला जिल्हाधिकारी आशुतोष सलील, पोलीस अधीक्षक अंकीत गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, वर्धा सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी, पोलीस निरीक्षक, वाहतूक निरीक्षक, जनहित मंचचे पदाधिकारी उपस्थित होते.(शहर प्रतिनिधी)
सुरळीत वाहतुकीकरिता योग्य नियोजनाचा सूर
By admin | Updated: July 19, 2015 02:11 IST