वर्धा : जिल्ह्यातील एक पोलीस कर्मचारी शेतकऱ्यांसह मोठ्या व्यावसायिकांना व्याजाने रक्कम देत असल्याच्या आरोपाची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली. या कर्मचाऱ्याचे नाव संतोष गौतम (ठाकूर) असे असून तो समुद्रपूर तालुक्यातील जाम येथील पोलीस चौकीत कार्यरत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. तक्रारीवरून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी हिंगणघाटचे ठाणेदार मोतीराम बोडखे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.तक्रारकर्ता व पैसे देणारा कथित सावकार यांच्यात कुठलेही लेखी पुरावे नसल्याने कारवाई करणे शक्य नसल्याचे चौकशी अधिकारी ठाणेदार मोतीराम बोडखे यांनी सांगितले. यामुळे पोलीस त्याच्या बचावाकरिता प्रयत्नरत असल्याचा आरोपही होत आहे. हिंगणघाट येथील धान्य व्यापारी चंद्रभान लढी यांचा पुत्र अरुण (४२) आणि त्याची पत्नी सविता (३८) यांनाही या खाकीवर्दीतील सावकाराने हैराण करून सोडल्याने त्यांनी ही तक्रार केली आहे. तत्पूर्वी हिंगणघाट ठाण्यात तक्रार करण्यात आली; पण त्याची दखल घेतली नसल्याचे तक्रारीत नमूद आहे. यामुळे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. ठाकूरच्या जाचामुळे त्रस्त असलेले दुसरे कर्जदार प्रदीप टिकमदास हेमनानी व चंदन मोटवाणी दोन्ही रा. हिंगणघाट यांनीही त्याच आशयाची लेखी तक्रार अधीक्षकांकडे केल्याची माहिती आहे. शिवाय त्यांनी भ्रमणध्वनीद्वारे संतोषकडून मिळणाऱ्या धमक्यांचे संभाषणही पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांना ऐकविल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.(प्रतिनिधी)
पोलीस कर्मचारीच झाला सावकार
By admin | Updated: July 26, 2015 00:29 IST