पीककर्जाच्या गर्दीत मुद्रा योजना दुर्लक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 01:06 AM2017-07-25T01:06:33+5:302017-07-25T01:06:33+5:30

सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरीच्या मागे न धावता स्वत:चा व्यवसाय सुरू करावा या हेतुने पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना अस्तित्वात आणली

Perennials neglected currency scheme | पीककर्जाच्या गर्दीत मुद्रा योजना दुर्लक्षित

पीककर्जाच्या गर्दीत मुद्रा योजना दुर्लक्षित

Next

सहकार्याची भावना तर कुठे केवळ दिखावा : अनेकांकडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सुशिक्षित बेरोजगारांनी नोकरीच्या मागे न धावता स्वत:चा व्यवसाय सुरू करावा या हेतुने पंतप्रधान मुद्रा कर्ज योजना अस्तित्वात आणली. या योजनेचा लाभ घेण्याकरिता युवक बँकेत गेले असता त्यांना विविध कारणे सांगून परत पाठविले जात आहे. सर्वत्र सध्या कर्जमाफी, पिककर्ज आणि पीक विम्याची कामे सुरू असून मुद्रा लोणकरिता नंतर या, असे सांगण्यात आल्याचे ‘लोकमत’च्या स्टींग आॅपरेशनमधून समोर आले. कर्मचाऱ्यांच्या आळशीपणामुळे एका चांगल्या योजनेचा बट्ट्याबोळ होत असल्याचेच यातून समोर आले आहे.
असे झाले स्टिंग आॅपरेशन
‘लोकमत’ चमूने जिल्हाभरात सोमवारी दुपारी १२ ते २ वाजताच्या दरम्यान विविध राष्ट्रीयकृत बॅँकांना भेटी दिल्या. यावेळी गावातील एक तरुण किंवा तरुणीला बॅँकेत मुद्रा योजनेंतर्गत कर्जाची मागणी बॅँक शाखा व्यवस्थापकांकडे करण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी शाखा व्यवस्थापकाशी संवाद साधला. त्यांना ही माहिती शाखा व्यवस्थापकांनी दिली. तो संवाद आम्ही वाचकांसमोर ठेवत आहोत. त्यानंतर ‘लोकमत’च्या स्थानिक प्रतिनिधींनी बॅँकेच्या व्यवस्थापकांना या योजनेबाबत विचारणा केली व त्यांची बाजूही जाणून घेतली. एकूणच शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीतील उणीवा समोर आणून या योजनेचा लाभ अधिकाधिक तरुणांना व्हावा, हा या मागचा ‘लोकमत’चा प्रामाणिक प्रयत्न आहे.

मुद्रा योजनेला बॅँकांकडूनच वाटाण्याच्या अक्षता
आष्टी (श.) - येथील एका सुशिक्षित बेरोजगार तरुणाने भारतीय स्टेट बँक शाखा, आष्टी येथे जाऊन व्यवस्थापकाची भेट घेतली. कर्जाबाबत सविस्तर संवाद साधला. या सर्व प्रश्नांना व्यवस्थापकांनी उत्तरही दिले.
युवक - सर नमस्कार,
मॅनेजर - बोला काय काम आहे,
युवक - सर मी सुशिक्षित बेरोजगार आहे. मी फेब्रीकेटर्सचा व्यवसाय करतो. या व्यवसायाच्या वृद्धीकरिता मला प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत ५ लाख रुपयांचे कर्ज पाहिजे होते.
मॅनेजर - अहो, सध्या आम्ही प्रत्येकी ५० हजारांचे कर्ज वाटप करीत आहोत. २०१६-१७ मध्ये काही बेरोजगार तरुण, बचत गटांना कर्ज दिले. यावर्षी २०१७-१८ मध्ये अद्याप वाटप सुरू झाले नाही. ते सुरू झाले की, तुम्हाला कळवितो. तुमचा मोबाईल नंबर देवून ठेवा.
युवक - पण, सर मी ५० हजारांत काय करू. महागाई वाढली आहे. त्यासाठी कमीत कमी ५ लाख रूपये द्या. मी पूर्ण रकमेची परतफेड करील.
मॅनेजर - अहो, हे शक्य नाही. सुरुवातीला ५० घ्या. नंतर १ लाख देऊ. तुम्ही परतफेड कराल, त्याप्रमाणे वाढीव कर्ज देता येईल. परंतु एकदम ५ लाख देणे शक्य नाही. जिल्ह्यात तुम्हाला कोणतीही बँक कर्ज देणार नाही.
युवक - पण सर माझे यात काहीच होणार नाही. १ टन लोहा विकत घेण्यासाठी ३६ हजार मोजावे लागले. मी घरी कुठलाही नफा देऊ शकणार नाही. मला वडील, आई, बहीण असा परिवार आहे. शिवाय बहिणीचे शिक्षण सुरू आहे.
मॅनेजर - यापेक्षा मी काहीच करू शकत नाही.
यावेळी व्यवस्थापकाच्या कॅबिनमध्ये बोरगाव (टुमणी) येथील एक तरूण मुलगा बसला होता. त्यानेही अभियांत्रिकीकरिता कर्ज मिळावे म्हणून मागणी केली होती. मात्र मॅनेजरने परतावा कसा कराल, याची हमी मिळाली तरच कर्ज देता येणे शक्य होईल, असे सांगितले.

केवळ ५० हजाराचेच कर्ज
तळेगाव (श्या.पं.) - बँक आॅफ इंडियामध्ये एका युवकाने शाखा व्यवस्थापक यांना मुद्रा कर्ज घ्यायचे आहे, असे सांगितले असता पहिले व्यवसायाची माहिती विचारण्यात आली. त्यानंतर तुसड्या भाषेत आवश्यक कागदपत्राची पूर्तता केल्यावरच व्यवसायाच्या क्षमतेनुसार कर्ज दिले जाईल, असे सांगितले. आतापर्यंत येथील ५० लोकांना मुद्रा कर्ज दिले. अर्धेच लोक कर्ज भरत असून अर्ध्या लोकांनी अजूनपर्यंत पैसे भरलेच नसल्याचे सांगितले.

मुद्रा कर्ज हे प्रत्यक्ष करीत असलेल्या व्यवसायाची पाहणी करून सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनच देतो. आतापर्यंत मुद्रा कर्ज दिलेल्या लोकांपैकी काहीच लोक भरत असून काही लोकांनी कर्ज भरलेच नाही. त्यामुळे काटेकोर सर्व बाबींची चौकशी करूनच कर्ज मंजूर करतो.
- अमोल गडाख, शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ इंडिया, तळेगाव (श्या.).

आवश्यक कागदपत्रांची मागणी
देवळी - भारतीय स्टेट बँकेच्या देवळी शाखेत मुद्रा कर्जाबाबत माहिती जाणून घेतली असता शाखाधिकाऱ्यांनी ५० हजारांचे मुद्रा लोण देण्यास काहीच अडचण नसल्याचे सांगितले. आवश्यक कागदपत्रात उद्योग, आधारकार्ड व न.प.चे व्यवसायाबाबतच्या परवान्याची मागणी त्यांनी केली.

सुशिक्षित युवकांना ५० हजारांपर्यंत मुद्रा कर्ज देण्यास काहीच आडकाठी नाही. आवश्यक कागदपत्र घेवून आल्यास सुविधा होईल.
- प्रवीण गोतुरकर, शाखाधिकारी भारतीय स्टेट बँक, देवळी.

तीन टेबलांवर चकरा
सेलू- येथील बँक आॅफ इंडियामध्ये मुद्रा लोणबाबत चौकशी करण्यासाठी गेलेल्या तरूणाचा बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने एकाकडे व दुसऱ्याने तिसऱ्याकडे बोट दाखविले. तिसरा चवथ्याकडे बोट दाखविल, असे वाटत असताना त्या कर्मचाऱ्याने सविस्तर माहिती दिली.
युवक - सर नमस्कार! मला व्यवसायासाठी मुद्रा योजनेंतर्गत कर्ज घ्यायचे आहे. माहिती हवी होती.
शाखा व्यवस्थापक - (आपल्याच कॅबीनमधून बोट दाखवित) ते समोर लेडीज कर्मचारी बसून दिसते ना, त्या टेबलवर जा, त्या माहिती देतील.
युवक - मॅडम, मला मुद्रा योजने अंतर्गत कर्ज घ्यायचे आहे. (वाक्य पूर्ण होण्याआधीच दुसऱ्या पुरूष कर्मचाऱ्याकडे बोट दाखविले.)
युवक - (पुरूष कर्मचाऱ्याला उद्देशून) सर, मला मुद्रा योजनेंतर्गत कर्ज घ्यायचे आहे. ते मिळेल का?
कर्मचारी - हो तुमचे या बँकेत खाते आहे का? तुम्ही सध्या काय करता? तुम्ही आवश्यक ते कागदपत्रे गोळा करा, मग आम्ही तुम्हाला व्यवसाय लावण्यासाठी तुमच्याकडे जागा आहे का? ती बघू किंवा तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर त्यासाठी सुद्धा नियमानुसार कर्ज देऊ.
युवक - मला किती रुपये कर्ज मिळेल. मी सध्या टीव्ही केबलचा पॉर्इंट चालवितो. एखादे दुकान टाकण्याची इच्छा आहे. मुद्रा योजनेचे कर्ज मिळाले तरच ते शक्य आहे.
कर्मचारी - बँकेतून कर्ज देता येते मात्र तत्पूर्वी आम्ही तुमचा व्यवसाय व व्यक्तीगत चौकशी करू. त्यानंतर ठरवू. तोपर्यंत तुम्ही आवश्यक त्या कागदपत्रांची जुळवाजुळव करून बँकेत खाते काढून घ्या.
युवक - सर्व करता येईल मात्र मला नक्की कर्ज मिळेल का? तरच मी पुढची प्रक्रिया करतो.
कर्मचारी - तुम्ही कागदपत्र दिल्यावर ते ठरविल्या जाईल.
युवक - ठिक आहे. माझा केबल पॉर्इंटचा व्यवसाय कसातरी सुरू आहे. त्याच्या वाढीसाठी मदत केली तर व्यवसाय वाढविता येईल.
कर्मचारी - ते बघू तुम्ही डाक्युमेंट गोळा झाल्यावर दाखवा, नंतर ठरवू.

मुद्रा योजनेंतर्गत कर्ज मागणाऱ्याचा अभ्यास करून आम्ही कर्ज देतो. मुद्रा कर्ज योजनेंतर्गत ५० हजार ते १० लाखापर्यंत कर्ज देण्याची तरतूद आहे. ५० हजारापर्यंत मुद्रा शिशु, ५० हजार ते ५ लाख मुद्रा किशोर आणि ५ ते १० लाखापर्यंत मुद्रा तरूण या मुद्रा योजनेंतर्गत कर्ज वाटप करता येते.
- सुभाष मसराम, शाखा व्यवस्थापक, बँक आॅफ इंडिया, सेलू.

मुद्रापेक्षा पीककर्ज घ्या
घोराड- येथील एचडीएफसी बँकेत गेलेल्या युवकाला बँकेकडून व्यवसायाबाबत विचारणा करण्यात आली. युवकाने व्यवसाय नसल्याचे सांगताच इनकम टॅक्स रिटर्न भरण्यासंदर्भात विचारणा केली. यावर तुमच्या कुटुंबाकडे शेती असेल तर पीक कर्ज देता येईल, असा सल्ला देण्यात आला.

आपण मुद्रा लोनच्या केसेस करीत असतो; पण त्यासाठी त्यामध्ये ठरवून दिलेल्या अटी व शर्थीची पूर्तता करणे आवश्यक आहे
- श्रीकांत सोलनकार, शाखा व्यवस्थापक, एचडीएफसी बँक घोराड.

कर्जमाफीची कामे सुरू आहेत, नंतर भेटा
पवनार - कर्जमाफीचा अहवाल तयार करावयाचा असल्यामुळे एक आठवडा किमान मुद्रा लोणवर एकही शब्द बोलता येणार नाही. नंतर निकष तपासून मुद्रा कर्ज देता येईल, असे उत्तर येथील सेंट्रल बँकेच्या शाखा व्यवस्थापकाने दिले.

शासनाने कर्जमाफी संदर्भात पात्र शेतकऱ्यांची यादी मागविली असल्यामुळे व दहा हजार रुपयांचे कर्ज शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावयाचे आहे. अपुरे मनुष्यबळ असल्यामुळे निदान दोन आठवडे तरी मुद्रा लोन देण्याची कार्यवाही थांबवावी लागेल, मुद्रा कर्ज देणे सुरू आहे.
- अर्चना सिंग, शाखा व्यवस्थापक, सेंट्रल बँक आॅफ इंडिया, पवनार.

मुद्रा कर्ज आॅगस्टनंतर
समुद्रपूर - येथील मोबाईल शॉपी चालविणाऱ्या एका दुकान मालकाला कर्जाकरिता पाठविले असता बँक व्यवस्थापकाने त्याला बघावे लागेल, असे म्हणत दुकानाबद्दल चौकशी केली. नंतर सध्या क्रॉप लोनची कामे चालू आहेत. यामुळे कर्मचारी त्याच कामात व्यस्त आहेत. मुद्रा लोणचे काम आॅगस्टनंतर बघु, असे सांगितले.
सध्या क्रॉप लोनचे काम सुरू आहे. वर्क लोड असून कर्मचारी कमी आहेत. कनेक्टीव्हीटी नाही. धंद्यातून उत्पन्न मिळवूनही कर्जाची परतफेड होत नाही. एप्रिलमध्ये इतर कामे कमी असतात. त्यामुळे एप्रिलमध्ये मुद्रा लोन केसेस होतात.
- चंद्रशेखर कोसारे, शाखा व्यवस्थापक, बॅँक आॅफ इंडिया, समुद्रपूर.

बँकेच्या खात्यात सहा महिन्यांच्या व्यवहाराची अट
हिंगणघाट - येथील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखाधिकाऱ्याकडे संपर्क साधला असता या बँकेतही बँक खात्याच्या सहा महिन्यांची उलाढाल व कर्जाचे प्रमाण तारण आवश्यक असल्याची माहिती मिळाली.
मुद्रा योजनेतील कर्ज थकबाकी ३० टक्के असल्याने नवीन कर्ज देताना सदर व्यक्तीच्या बँक खात्याची उलाढाल व तारण कर्ज परतफेडीसाठी आवश्यक आहे.
- विजय अरोरा, शाखाधिकारी पंजाब नॅशनल बँक, हिंगणघाट.

एक महिन्यानंतर भेटा
वायगाव - येथील बँक आॅफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाकडे मुद्रा कर्जाबद्दल मागणी केली तर सध्या कर्ज देणे बंद आहे. एक महिन्यानंतर विचार करू. तुम्ही खाते काढा त्यानंतर व्यवहार पाहून देऊ, असे उत्तर देण्यात आले. तसेच मुद्रा कर्जासाठी भारतीय स्टेट बँक वायगाव (नि.) येथे व्यवसायाची विचारणा करण्यात आली. त्याबाबत प्रोजेक्ट रिपोर्ट, लागणारे साहित्य, त्याचे कोटेशन व आवश्यक कागदपत्रे आणण्यासंदर्भात माहिती दिली.

पूर्वी बँकेमार्फत देण्यात आलेले मुद्रा कर्ज कुठलाही तपास न करता दिले गेले आहे. यात वसुलीही होत नाही. आमच्या शाखेमार्फत मुद्रा कर्ज देण्यात येत आहे. मात्र कर्ज घेणारे व्यक्ती कुठला व्यवसाय करतात, जागेची पाहणी, दिलेले प्रोजेक्ट रिपोर्ट, लागणारे साहित्य, कोटेशन व किंमत व्यवस्थित पूर्ण पाहणी केल्यानंतर आम्ही ग्राहकाला मुद्रा कर्ज ंबँकेमार्फत देतो.
- भूषण काकर, प्रभारी शाखा व्यवस्थापक एस.बी.आय., वायगाव (नि.).

पुलगाव - येथील भारतीय स्टेट बँकेत गेलेल्या युवकाला शाखाधिकारी सुहास ढोले यांनी माहिती दिली. स्टेट बँक आॅफ इंडिया शाखेत शाखाधिकारी बाहेर गेल्याने सुमीत झा नामक अधिकाऱ्याने पूर्ण प्रक्रिया समजावून सांगितली. बँक आॅफ महाराष्ट्राचे शाखाधिकारी घोडे यांनीही प्रस्तूत युवकाला मुद्रा कर्जाबाबत माहिती दिली.

संकलन - भास्कर कलोडे (हिंगणघाट), प्रफुल लुंगे (सेलू), अमोल सोटे (आष्टी), हरिदास ढोक (देवळी), प्रभाकर शहाकार (पुलगाव), गौरव देशमुख (वायगाव), विजय माहुरे (घोराड), प्रमोद भोजणे, (तळेगाव, श्या.पं.), हर्षल तोटे (पवनार), प्रफुल्ल महंतारे (समुद्रपूर), योगेश वरभे (अल्लीपूर)

Web Title: Perennials neglected currency scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.