आरोपी फरार : मोर ताब्यात तर साहित्य जप्तसेलू : सुरगाव ते कामठी परिसरातील जंगलात बंदुकीचा वापर करून तीन मोरांची शिकार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. यात मृतावस्थेत आढळलेले मोर व शिकारीचे साहित्य पोलिसांच्या हाती आले असले तरी आरोपी मात्र पसार झाले आहेत. यामुळे वनविभागाच्या कार्यावर संशय व्यक्त होत आहे. या परिसरात मोरांच्या शिकारीच्या घटना वाढत आहे. मिळालेल्या माहितीवरून सुरगाव ते कामठी शिवारातील जंगलात शिकार केलेल्या मोरांसह आरोपी येत असल्याची गुप्त माहिती झडशी सहवन क्षेत्राचे क्षेत्रसहायक राजू तुमडाम यांना मिळाली. त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने सुरगाव ते कामठी परिसरात सापळा लावला. येथे शाळेच्या मागे असलेल्या नदीच्या किनाऱ्यावर वनकर्मचाऱ्यांची गस्त सुरू असताना अंधारात चार ते पाच इसम पाठीवर गाठोडे घेऊन येताना दिसले. वनअधिकाऱ्यांना पाहताच त्यांनी पळ काढला; पण त्यांच्या खांद्यावरील गाठोडे येथे पडले. या गाठोड्याची पाहणी केली असता मृतावस्थेत असलेले तीन मोर, एक भरमार बंदूक, दोन सुरे, बारूद आदी साहित्य मिळाले. कारवाई क्षेत्रसहायक राजू तुमडाम, बीटरक्षक कोटजावरे, मुंगले, नागरजोगे, सोनटक्के, भांडेकर यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)
सुरगाव, कामठी शिवारात मोरांची शिकार
By admin | Updated: March 5, 2016 02:23 IST