वादळामुळे तुटलेल्या वीज तारा तशाच पडून लोकमत न्यूज नेटवर्क पवनार : गत आठवड्यात आलेल्या वादळामुळे अनेक विद्युत खांब कोसळले. वीज ताराही तुटल्या. मात्र त्याच्या दुरूस्तीच्या कामाला गती मिळत नाही. यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी अचानक महावितरणाच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेतकऱ्यांनी कनिष्ठ अभियंता कोरे यांना धारेवर धरले. यावेळी कोरे यांनी उपकार्यकारी अभियंता संजय पूरी यांना सहकार्यासाठी बोलाविले. पूरी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या ऐकून घेत शेतकऱ्यांच्या मागण्या वरिष्ठांकडे कळवित असल्याचे सांगितले. परंतु शेतकऱ्यांचे समाधान न झाल्याने त्यांनी वरिष्ठांना येथेच बोलवा अशी मागणी रेटून धरली. तेव्हा कार्यकारी अभियंता खूरपुडे यांना पाचारण करण्यात आले. त्यांच्यासमोर शेतकऱ्यांनी दररोज किमान ११ तास सलग वीज पुरवठा, सिंगल फेज नेहमीकरिता सुरू ठेवणे, वीज पुरवठा खंडित झाल्यास कालावधी वाढवून वीज पुरवठा करणे, दुरूस्तीची कामे ताबडतोब पूर्ण करण्याची मागणी केली. कार्यकारी अभियंत्यांनी १२ तास वीज पुरवठा करणे ही मागणी मान्य केली. यावेळी पं.स. सदस्य प्रमोद लाडे, तंटमुक्ती अध्यक्ष किरण गोमासे, पुरूषोत्तम टोणपे यांनी वाटाघाटी घडवून आणण्यात मोलाची भूमिका बजावली. आंदोलनात परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पवनारवासीयांची वीज कार्यालयावर धडक
By admin | Updated: June 21, 2017 00:42 IST