शाळेचा पहिला दिवस तोंडावर : जिल्ह्यात नोंदणीकृत ३७७ स्कूल बसेस रूपेश खैरी । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : शाळांची घंटा वाजण्याची वेळ आली आहे. पालकांकडून आपल्या पाल्याला शाळेत पाठविण्याची लगबग सुरू झाली. वेळेअभावी पालकांच्या वेळापत्रकात त्यांच्या पाल्याला शाळेत नेणारी स्कूल बस महत्त्वाची ठरते. यामुळे पालकांनी या स्कूल बसबाबत वेळीच सतर्कता बाळगत चौकशी करून बसची निवड करणे गरजेचे आहे. उप-प्रादेशिक परिवहन विभागाच्या माहितीनुसार जिल्ह्यात ३७७ स्कूल बस नोंदणीकृत आहे. या स्कूल बसच्या माध्यमातून चिमुकल्यांना शाळेत पोहोचविले जाते. यात १२ पेक्षा जास्त आसन संख्या असलेल्या सहा बसगाड्या आहेत. उर्वरीत पिवळ्या रंगाच्या छोट्या मिनीबस आहेत. या शिवाय जिल्ह्यात एकाही आॅटोला स्कूलआॅटो म्हणून परवानगी नसल्याचे सांगण्यात आले आहे. या वाहनातून मोठ्या प्रमाणात चिमुकल्यांना घरून शाळेत आणि शाळेतून घरी नेण्यात येते. या काळात एकाच वाहनात कोंबून विद्यार्थी नेण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. हा प्रकार करताना वाहन मालकाकडून त्याचा फायदा पाहिला जातो. तर काही पालकांकडून महागाईचा विचार करून वाहनाची निवड केली जाते. नियमांना बगल देत होत असलेल्या या व्यवहारात कधीही अपघात होण्याची शक्यता बळावते. अशा घटना जिल्ह्यात घडल्याच्या नोंदी आहेत. यामुळे पालकांनी स्कूलबसची निवड करताना पाल्याच्या सुरक्षेचा विचार करणे गरजेचे आहे. स्कूल बसमध्ये काही सुविधा असणे अनिवार्य आहे. मात्र या सुविधांकडे पालकांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून आले आहे. आपल्या पाल्याला बसमध्ये पाठविताना या सुविधांची चौकशी प्रत्येकाकडून होणे गरजेचे आहे. यातूनच चिमुकल्यांना अपघात विरहीत सेवा पुरविणे शक्य आहे. यामुळे पालकांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. तर वाहन मालकांनी तशी सेवा आपल्या स्कूल बसमध्ये देत त्याची नोंद उपप्रादेशिक परिवहन विभागात करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लवकरच सुरू होणार असलेल्या शैक्षणिक सत्राच्या काळातही अशा वाहन धारकांवर उप-प्रादेशिक परिवहन विभागाची करडी नजर असणार आहे. त्यांनी शाळा सुरू होण्यापूर्वी आपल्या वाहनाची तपासणी करून घेण्याचे आवाहन उप-प्रादेशिक परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. २०१६-१७ च्या सत्रात नियम तोडणाऱ्यांना एकूण २.६८ लाखांचा दंड उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने गत शैक्षणिक सत्रात स्कूल बसच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांविरोधात चांगलीच कंबर कसली होती. विभागाच्यावतीने सन २०१६-१७ या काळात एकूण २०४ स्कूल बसची तपासणी केली. या तपासणी दरम्यान ७५ वाहने विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करीत असल्याचे दिसून आले. यापैकी ५३ स्कूल आणि विद्यार्थ्यांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या तब्बल ३९ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. यातील एकूण ४० वाहने अडवून ठेवण्यात आली आहे. या वाहन मालकांकडून तडतोड शुल्क म्हणून १ लाख ३५ हजार ८०० तर विभागीय तडजोड शुल्क म्हणून १ लाख ३३ हजार १०० रुपये असा एकूण २ लाख ६८ हजार ९०० रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. स्कूल बसमध्ये आवश्यक असलेल्या सेवा वाहनाचा रंग पिवळा असावा, वाहनाच्या पुढच्या आणि मागच्या बाजुला ‘स्कूल बस’ असे शब्द लिहिलेले आहेत, वाहनाच्या खिडकीखाली सर्व बाजूनी १५० मिलीमीटर रुंदीचा विटकरी पट्टा रंगविलेला असून त्यावर शाळेचे नाव लिहिने आवश्यक आहे. शालेय कंत्राटाशिवाय अन्य कोणतेही कंत्राट असल्यास वाहनाच्या खिडकीखाली सर्व बाजूना ४०० मिलीमीटर रुंदीच्या पिवळ्या पट्टीने रंगविलेले असणे आवश्यक आहे. बसच्या दोन्ही बाजूला बर्हिवक्र भिंगाचे आरसे बसविलेले असावे, चालकाला बसच्या आतील भागातील सर्व दृष्य स्पष्ट दिसण्यासाठी मोठा पॅराबोलिक आरसा बसविणे आवश्यक आहे. वाहनाचा वेग ४० किलोमीटर प्रति तास पेक्षा अधिक असणार नाही, अशा पद्धतीने वाहनाला वेग नियंत्रक बसविलेले असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९२ मध्ये नमूद केलेल्या वस्तुंचा, औषधांचा अंर्तभाव असणारी सुसज्ज प्रथमोपचार पेटी वाहनात आवश्यक आहे. आय.एस.आय.मार्क असलेली ए.बी.सी. प्रकारची अग्नीशमन उपकरणे चालकाच्या कक्षामध्ये, आसनाजवळ ठेवणे आवश्यक आहे. बसच्या मागे व पुढे शालेय मुलगा व मुलीचे चित्र असलेले ३५० बाय ३५० मिलीमीटर आकारचे स्टीकर, फलक आवश्यक आहे. चित्रांच्या खाली काळ्या रंगामध्ये स्कूल बस लिहिले असून त्याच्या अक्षराची उंची १०० मिलीमीटर असणे आवश्यक आहे.
स्कूल बसबाबत पालकांनी सतर्कता बाळगावी
By admin | Updated: June 24, 2017 00:48 IST