आशुतोष सलील : गावागावांत जाऊन विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी मोहीम राबविणारवर्धा : समाजातील ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकाला शाळेत प्रवेश देण्यासाठी तसेच एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे येत्या ४ जुलै रोजी जिल्ह्यातील शाळाबाह्य असणाऱ्या अशा प्रत्येक विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिली.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात शाळाबाह्य बालकांच्या एक दिवसीय सर्वेक्षणाबाबत आढावा घेण्यात आला. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली असता ते बोलत होते. अप्पर जिल्हाधिकारी संजय भागवत, मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार, शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर, शिक्षणतज्ज्ञ, जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांसह विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.शाळाबाह्य तसेच शाळेत न जाणारी बालके, ज्यांनी शाळेत प्रवेश घेवूनही शिक्षणपूर्ण केले नाही, तसेच एक महिन्यापेक्षा अधिक काळ अनुपस्थितीत राहले अशा सर्व बालकांचा शोध घेवून त्यांना शाळेत आणण्यासाठी शोध मोहीम राबविण्यात येत आहे. तालुका तसेच जिल्हास्तरावर शिक्षण महसूल तसेच सर्व विभागांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्वक्षणामधुन एकही बालक सुटणार नाही यासाठी सर्र्वेक्षित बालकांच्या बोटाला निवडणुकीत लावतात तशी शाही लावली जाईल. या मोहिमेमध्ये सर्वेक्षण अधिकारी, झोनल अधिकारी तसेच नियंत्रक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी सांगितले.जिल्हा व तालुकास्तरावर तसेच ग्रामस्तरावर यासाठी समित्या तयार करण्यात आल्या आहेत. बाजार रेल्वेस्थानक, बसस्थानक तसेच झोपडपट्टी, जंगलात आदी ठिकाणी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत घरोघरी जाऊन नोंदी करण्यात येणार आहे. तहसीलदार तसेच गटशिक्षणाधिकारी यांनी संयुक्तपणे ही मोहीम राबवावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले.शाहाबाह्य मुलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या तसेच नगरपरिषदाच्या जिल्ह्यातील १ हजार २०० शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. अपंग विद्यार्थ्यांच्या बाबतीत नोंद घेताना त्यांच्या घरी जावून विशेष शिक्षण देण्यात येईल. तसेच अल्पसंख्य विद्यार्थ्यांच्याबाबतीत ही विशेष नोंद घेवून त्यांना शाळेत आणण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.(शहर प्रतिनिधी)
एकही मूल शाळाबाह्य राहणार नाही
By admin | Updated: June 21, 2015 02:27 IST