खोलीकरणही करणार : नागरिकांच्या मागणीची दखलसेलू : बोर नदी पात्राला बेशरमसह अन्य वनस्पतींनी विळखा घातला होता. बोर धरणापासून पुढे वाहणारे पात्र बेशरमने व्यापले आहे. यामुळे गावांत दुर्गंधी पसरली आहे. शिवाय पाणीही दूषित होत आहे. यामुळे नागरिकांनी बोर नदीचे पात्र स्वच्छ व खोल करण्याची मागणी केली. याबाबत वृत्तही प्रकाशित झाले. नागरिकांच्या या मागणीची नगर पंचायत प्रशासनाने दखल घेतली असून नदी पात्र स्वच्छ व खोल करण्याचे काम सुरू करण्यात आले. नगर पंचायतीने बोर नदीपात्राचे खोलीकरण व स्वच्छतेला गुरुवारी सुरुवात केली. यामुळे नागरिक समाधान व्यक्त करीत आहेत. बोर नदी ही शहर व परिसरातील गावांचे वैभव आहे. याच नदीमुळे अनेक शेतकऱ्यांना सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. नदीमुळे काठावरील गावांना पाणीटंचाई जाणवत नाही; पण गत अनेक वर्षांपासून नदीपात्राची स्वच्छता करण्यात आली नाही. यामुळे पावसाळ्यात पुराच्या पाण्याने वाहून आलेला गाळ व बेशरमच्या झुडपांनी पात्र अरूंद झाले. परिणामी, पुराचे पाणी काठावरील गावात शिरण्याची घटना अनेकदा घडली आहे. यात मोठे नुकसान झाले. अनेकांच्या घरांची पडझड होऊन संसार उघड्यावर आले; पण प्रशासनाने नदीपात्र खोलीकरण करण्याकडे दुर्लक्षच केले. विविध संघटनांनी निवेदने दिली; पण याकडे दुर्लक्षच केले जात होते. याबाबत वृत्त उमटल्यानंतर मात्र नगर पंचायत प्रशासनाला जाग आली व कामास प्रारंभ झाला. नगर पंचायतीने घोराड ते सेलू येथील बंधाऱ्यापर्यंत जेसीबीच्या साह्याने बेशरमची झुडपे, शेवाळ, प्लास्टिक व इतर कचरा काढण्यास सुरुवात केली. इतरही गावांजवळील नदीपात्राचे खोलीकरण करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.(तालुका प्रतिनिधी)
नगर पंचायतीने केली बोर नदी पात्राची स्वच्छता
By admin | Updated: May 30, 2016 01:59 IST