लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद): शासनाच्या नाफेड सोयाबीन खरेदीला विविध संकटांचे ग्रहण लागल्यामुळे बळीराजा संकटात सापडला आहे. त्यातच आता अवघे दोन दिवस शासकीय सोयाबीन खरेदीला उरले. अशातच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ केंद्र कारंजा येथील भांडारपालाच्या बेजबाबदार वर्तनामुळे गेल्या काही दिवसांपासून आष्टी येथील खरेदी-विक्री संघाकडून शासकीय सोयाबीनचे ट्रक पाठवल्यावर ते जाणीवपूर्वक उभे करून ठेवतात. त्यामुळे आष्टीला सोयाबीन खरेदी ठप्प झाल्याने उर्वरित सोयाबीन खरेदी होणार की नाही. या बेजबाबदार भांडारपालावर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहकारमंत्रीकडे निवेदनातून मागणी केली आहे.
८ हजार ८८१ क्विंटल ५० किलो सोयाबीन खरेदीयात ८ हजार ८८१ क्विंटल ५० किलो सोयाबीन खरेदी झाली. त्यानंतर या सोयाबीनचे पोते भरून तीन ट्रक कारंजा येथील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ वेअर हाउसला पाठविण्यात आले. तेथे कार्यरत भंडारपाल डी.बी. उघडे यांनी गेल्या दोन दिवसांपासून आष्टी वरून पाठविलेले तिन्ही ट्रक उभे करून ठेवले. त्यामुळे सदर ट्रक सोयाबीन खाली करून आष्टीला वापस आले नाही. त्यामुळे आणखी नव्याने खरेदी केलेले ७३० क्विंटल सोयाबीन जागेअभावी खरेदी विक्री संघाच्या आवारात पडून आहे.
"खरेदी विक्री संघाच्या अंतर्गत नाफेडची सोयाबीन खरेदी युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, कारंजा येथे पाठवलेले ट्रक अद्याप परत आले नाही. त्यामुळे वजनमापे करायला जागा नाही. कारंजावरून ट्रक आल्यानंतर उर्वरित जमा असलेली सोयाबीन भरून पाठवण्यात येईल. त्यानंतर नवीन सोयाबीन केल्या जाईल."- विपिन पोकळे, व्यवस्थापक, तालुका खरेदी विक्रीसंघ, आष्टी