गौरव देशमुख - वायगाव (नि़)शेतकऱ्यांना हवामानामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानाची भरपाई मिळावी म्हणून ‘वेदर इन्शुरन्स’ योजना सुरू केली. यात शेतकऱ्यांच्या खात्यातून रक्कमही कपात करण्यात आली; पण याचा लाभ शेतकऱ्यांना मिळणार वा नाही यावर प्रश्न निर्माण झाला आहे. ‘वेदर इन्शुरन्स’चा सर्व्हे मार्च २०१५ मध्ये करण्यात येणार असल्याचे बँकांद्वारे सांगण्यात आले आहे. जून ते जानेवारी या काळात असलेल्या खरीपाच्या विम्याचा सर्व्हे मार्चमध्ये होणार असल्याने तो शेतकऱ्यांसाठी की बँकांकरिता, हा प्रश्नच आहे़ यंदाच्या अनियमित हवामानामुळे मोठा फटका खरीप पिकांना बसला. यामुळे उत्पन्नात प्रचंड घट झाली. यात शेतकऱ्यांनी शासकीय बँकेतून पीक कर्ज घेतले. यावेळी बँक अधिकाऱ्यांनी कोेणत्याही सूचना न देता ‘वेदर इन्शुरन्स’ च्या नावाने प्रत्येक शेतकऱ्याला खात्यातून एकरी एक हजार रुपये कपात केले़ यंदा झालेल्या नुकसानात या पीक विम्याचा लाभ मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. पीक विम्याचा सर्व्हे मार्च २०१५ मध्ये करण्यात येणार असल्याचे सांगितले. हे ऐकून शेतकरी अवाक् झाले. जुलै ते जानेवारीच्या काळापर्यंत असलेल्या खरीप हंगामात पिकाचे नुकसान मार्च महिन्यात कसे ठरणार, हा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. विमा कंपनीचे कर्मचारी सर्व्हे करणार की जागेवरून नावे लिहितील, हे समजने कठिण आहे़ बँकेने कपात केलेल्या रकमेची माहितीही देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले़
खरिपातील पीक विम्याचा सर्व्हे मार्च महिन्यात
By admin | Updated: December 3, 2014 22:54 IST