वर्धा : लांबलेला मान्सून शेतकऱ्यांचे प्राण कंठाशी आणणारा ठरला असतानाच छत्र्या, रेनकोट व अन्य पावसाळी साहित्याची विक्री ठप्प पडल्याने लाखो रुपयांच्या बाजारपेठेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.जूनच्या पहिल्या आठवड्यात गजबजवणारी पावसाळी साहित्याची दुकाने ओस पडल्याचे चित्र आहे. छत्र्या, मेनकापड, ताडपत्री, रेनकोट, टोप्या अशा वस्तू ठिकठिकाणी धुळखात पडल्या आहेत. साधारणत: जूनच्या पहिल्या आठवड्यात या साहित्याच्या विक्रीला पावसासारखेच उधाण येते. जून अखेरीस शाळा सुरू झाल्यानंतर बच्चे कंपनीच्या रेनकोटवर उड्या पडू लागतात. पावसाळी साहित्याची प्रामुख्याने मुंबई व कोलकत्याहून ठोक भावाने खरेदी होते. व्यापाऱ्याच्या मते छत्री व रेनकोट उत्पादनाची ही देशातील दोन प्रमुख केंद्र आहेत. याच ठिकाणी नामांकित तसेच स्थानिक व विदेशी वस्तूंची उलाढाल होते. यावेळी चीनचा माल ही बाजारपेठेत आहेतच. मात्र गतवर्षीपेक्षा तुलनेने तो कमी आहे. या पावसाळी साहित्यात छत्र्यांची मोठी उलाढाल होते.फोल्डिंगच्या चौकोनी, गोल कॅपशेप, डायमंड, कार्टून छत्री अडीचशे रुपयापासून तर बहूरंगी छत्री शंभर रुपयापासून उलपब्ध आहेत. पॉलिस्टर व नायलॉन कापडाच्या या छत्र्यांपैकी भारतीय बनावटीच्या छत्र्या या चिनी छत्र्यापेक्षा अधिक टिकावू असल्याचे विक्रेते सांगतात. रेनकोटचा प्रकार महागडा असला तरी यावेळी त्यातही माफक किमतीचे रेनकोट उपलब्ध झाले आहेत.लॅपटॉप तसेच स्कूल बॅग सामावून घेणारे रेनकोट विद्यार्थ्यांमध्ये तसेच वनपीस रेनकोट महिलांमध्ये प्रिय आहेत. या वस्तूंच्या किमतीत यावर्षी १० ते १५ टक्क्याने वाढ झाली आहे. चौकात छत्रीखाली दुकान थाटून जून्या छत्र्या दुरूस्त करणारे थोडे व्यस्त आहेत. रेनकोट शिवले जात आहेत. मात्र नवी खरेदी ठप्प आहे.(शहर प्रतिनिधी)
मान्सून लांबल्याने पावसाळी साहित्याची विक्री ठप्प
By admin | Updated: July 7, 2014 00:04 IST