पवनार येथे कारवाई : दोन दिवसांपासून गस्तीत वाढवर्धा : पवनार आश्रम परिसरात असलेल्या धाम नदीच्या पात्राजवळ काही अल्पवयीन मुली संशयास्पदस्थितीत महिला पोलीस पथकाला आढळल्या. यातील दोन मुलींला विचारणा केली असता काही मुले छायाचित्र दाखवून ‘ब्लॅकमेल’ करीत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. यानंतर पोलिसांनी त्यांच्या पालकांशी संपर्क साधला असता बदनामीच्या भीतीपोटी पालकांनीही रितसर तक्रार करण्यास नकार दिल्यामुळे पोलीस हतबल झाले असले तरी हा प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरू असल्याची माहिती आहे. धाम नदीच्या काठावर गत काही दिवसांपासून मुले-मुली बघायला मिळत आहे. त्यांच्या विचित्र वागण्यावरुन हा प्रकार गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितला. यावरून बुधवारी पोलीस विभागाच्या विशेष महिला पथकाच्या अधिकारी ममता अफूने व त्यांच्या पथकाने या भागात गस्त सुरू केली. दरम्यान, दोन अल्पवयीन त्या ठिकाणी आढळल्या. त्यांना सेवाग्राम पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याची माहिती त्यांच्या पालकांना देण्यात आली. या माहितीवरून पालकांनी पोलीस ठाणे गाठले. या मुली सज्ञान असल्याने त्यांना समज देत पालकांच्या स्वाधीन केले. यानंतर कुठे असे कृत्य करताना आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, असा दमही त्यांना देण्यात आला.गुरुवारी सकाळी पुन्हा महिला पोलीस पथक या परिसरात चौकशी करण्याकरिता गेले. यावेळी त्यांना दोन अल्पवयीन मुली शाळेच्या गणवेशात तिथे बसून असल्याचे दिसले. त्यांना विचारणा केली असता प्रारंभी त्यांनी येथे सहज आल्याचे सांगितले. मात्र पोलिसांनी अधिक विचारणा केली असता धक्कादायक वास्तव पुढे आले. त्यांच्या शाळेसमोर दोन युवकांनी या मुलींसोबत छायाचित्र काढले. या छायाचित्राच्या आधारावर ती मुले त्यांना ‘ब्लॅकमेल’ करीत असल्याची माहिती पोलिसांना दिली. यावरून पोलिसांनी या मुलींना सेवाग्राम ठाण्यात नेत त्या मुलांबद्दल विचारणा केली. त्यांनी संपूर्ण माहिती पोलिसांना दिली. यावरून पोलिसांनी शाळेच्या मुख्याध्यापकासह मुलींच्या पालकांना ठाण्यात पाचारण करुन माहिती देण्यात आली. या प्रकारामुळे पालकही विचारातच पडले. या प्रकरणी त्यांना तक्रार करण्यासंदर्भात सांगण्यात आले; मात्र त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्या युवकांकडे असलेले छायाचित्र भीती बाळगण्यासारखे नसल्याने या दोन अल्पवयीन मुलींना घाबरण्याचे कारण नसल्याचे पोलिसांनी सांगितले. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.(प्रतिनिधी) पालकांची सतर्कता गरजेचीकामाच्या व्यस्ततेत पालकांकडून त्यांच्या पाल्यांच्या वागण्या व बोलण्याकडे किंबहूना त्यांच्या समस्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे प्रकार बऱ्याच प्रकरणातून दिसून आले आहे. आपला मुलगा वा मुलगी कोणत्या वेळी कुठे जातो, त्यांचे मित्र कोण आहेत, याची माहिती पालकांनी ठेवणे गरजेचे झाले आहे. मात्र पालकांकडून या बाबतीत विचारच करण्यात येत नाही. यामुळे असे प्रकार घडत असून प्रमाणात वाढ झाल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञांनी व्यक्त केले.पालकांची तक्रार नसल्याने युवकांचे फावले मुलीचे छायाचित्र काढून तिला ब्लॅकमेल करणाऱ्या युवकांविरोधात पालकांकडून तक्रार करण्याकरिता नकार देण्यात येत आहे. त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून इभ्रतीचे कारण पुढे काढण्यात येत आहे. त्यांची तक्रार नसल्याने अशा युवकांचे फावत आहे. पालकांनी कुठलीही भीती मनात न बाळगता तक्रार केल्यास पोलिसांना कारवाई करणे सोपे जाईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.थोडक्यात अनर्थ टळला छायाचित्राच्या आधारे ब्लॅकमेल करणाऱ्या युवकांकडून या मुलींशी अश्लिल चाळे करण्याचा प्रकार सुरू झाला होता. हा प्रकार वाढण्यापूर्वी या मुली पोलिसांच्या हाती आल्याने मोठा अनर्थ टळला, असेही पोलिसांचे म्हणणे आहे. शिवाय त्या मुलांकडे असलेले छायाचित्र विशेष फरक पाडणारे नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
छायाचित्राच्या आधारे अल्पवयीन मुलींचे ‘ब्लॅकमेलिंग’
By admin | Updated: September 25, 2015 02:39 IST