भास्कर कलोडे हिंगणघाटतालुक्यातील वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांचा या रुग्णालयाशी केवळ पगारापुरता संबंध आहे. यामुळे रुग्णांची गैरसोय होत असून लिपिक सुद्धा १० दिवसांपासून बेपत्ता आहे. यामुळे येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे वेतन अद्याप झालेले नाही़ त्यामुळे काम न करता वेतन घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे़राष्ट्रीय महामार्ग ७ वरील वडनेर येथील ग्रामीण रुग्णालय वडनेर, पोहणा, शेकापूर(बाई), अल्लीपूर या चार जिल्हा परिषद सर्कलमधील ग्रामीण नागरिकांसाठी अतिमहत्त्वाचे असून राष्ट्रीय महामार्गावर असल्याने आपातस्थितीत प्राथमिक उपचारासाठी सदर रुग्णालय गरजेचे आहे़ ३० खाटाच्या या रुग्णालयात दररोज १५-२० रुग्णांची आयपीडी तर १५० ते २०० रुग्णांची ओपीडी आहे. सदर रुग्णालयात औषधसाठा पुरेसा येत असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे असले तरी काही रुग्णांना इंजेक्शन, टॉनिक औषधी बाहेरून आणल्याचे सांगितले जात आहे. या रुग्णालयात एकूण तीन रुग्णवाहीका असून यापैकी एक भारत विकास ग्रुपच्या अंतर्गत आहे़ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निकृष्ट दर्जाची असून एक मात्र थंड पाण्याची मशीन असून ती बंद आहे़ मोटार पंपाचे आपरेटींग रूमवरील टिना उडाल्याने पावसात अनुचित होण्याची भीती आहे. या रुग्णालयातील लिपिक २४ जूनपासून बेपत्ता असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अद्याप वेतन झाले नाही़ एक वैद्यकीय अधीक्षक व तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांवर या ग्रामीण रुग्णालयाची जबाबदारी आहे. केवळ दोनच डॉक्टर कार्यरत असून एक वैद्यकीय अधिकाऱ्याला सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठविले आहे़ वैद्यकीय अधीक्षकाचा प्रभार सांभाळणारे डॉक्टर लोणीकर महिन्यातून दोन-तीनदा या रुग्णालयाला भेट देतात. त्यामुळे अनियमित सेवा देणाऱ्या वैद्यकीय अधीक्षकाचे वेतन कसे असाही प्रश्न निर्माण झाला आहे़ या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी रुग्णांनी केली आहे.
वैद्यकीय अधिकारी पगारापुरताच
By admin | Updated: July 5, 2014 01:07 IST