चैतन्य जोशी लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : ३९ वर्षापूर्वी १९ मार्च १९८६ या दिवशी यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील चिलगव्हाणचे रहिवासी साहेबराव करपे या शेतकऱ्याने जगणे असह्य झाल्यामुळे संपूर्ण कुटुंबासह वर्धा जिल्ह्यातील दत्तपूर येथील कुष्ठधामात आत्महत्या केली होती. ही आत्महत्या राज्यातील पहिली शेतकरी आत्महत्या म्हणून नोंद झाली होती. या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. या घटनेला उद्या, बुधवारी १९ मार्चला ३९ वर्षे पूर्ण होत आहेत.
या घटनेनंतरही राज्यात शेतकरी आत्महत्यांची सुरू झालेली साखळी आजही सुरूच आहे. मागील दोन महिन्यांत वर्धा जिल्ह्यात ४० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे वास्तव आहे. तशी नोंदही प्रशासनाने घेतली आहे. शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र आघाडीवर आहे.
सरकारे बदलली पण, शेतकऱ्यांचे हाल थांबले नाहीत. आता परिस्थिती आणखी बिकट बनली आहे. कालपर्यंत शेतकरी आत्महत्या करीत होते. नवीन आकडेवारीवरून आता शेतकऱ्यांची मुले फार मोठ्या संख्येने आत्महत्या करीत आहेत.
शेतकरी आत्महत्यांची कारणे काय?सातत्याने तोट्याच्या शेतीतून शेतकऱ्यांची होणारी आर्थिक कुचंबणा, हे आत्महत्येचे मुख्य कारण मानले जाते. शेतीला सिंचन, विजेचा अभाव, महागडे बियाणे, खते, कीटकनाशके, पेरणीच्या हंगामात पुरेशा कर्ज पुरवठ्याचा अभाव, सावकारी बेहिशेबी कर्जाचा पाश, नैसर्गिक आपत्ती, बाजारात होणारी लूट, कमी भाव ही शेती तोट्यात जाण्याची प्रमुख कारणे आहेत.
जिल्ह्यातील पाच वर्षांतील आकडेवारीवर्ष आत्महत्या२०२० १५२२०२१ १६१२०२२ १५४२०२३ १०९२०२४ ११०२०२५ ४० (फेब्रुवारीपर्यंत)
अर्थव्यवस्थेला तारणारा का मरतो?
- अर्थसंकल्पापूर्वी राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल विधिमंडळात ठेवला. त्यात उद्योग तसेच सेवा या दोन महत्त्वाच्या क्षेत्रांत चालू आर्थिक वर्षात राज्याची पीछेहाट झाल्याचे म्हटले आहे.
- मात्र, गेल्यावर्षी झालेल्या दमदार पावसाने कृषिक्षेत्राला तारत अर्थव्यवस्थेला आधार दिल्याचे म्हटले. हाच प्रकार कोरोना काळात होता.
- सर्व बंद असताना शेती सुरू होती. अख्खे जग शेतीने जगवले. जगाला जगविणारा, अर्थव्यवस्थेला तारणारा शेतकरी का मरतो, याचा विचार आता प्राधान्याने करण्याची वेळ आली आहे.