लोकमत न्यूज नेटवर्क रोहणा: शहरासह ग्रामीण भागातही किडनीसंदर्भात आजारात मोठी वाढ झाली आहे. परिणामी, अनेकांना डायलिसिस करावे लागते. डायलिसिसची सुविधा केवळ जिल्हापातळीवर असल्याने रुग्णांसह नातेवाइकांची मोठी पायपीट होत आहे. त्यामुळे डायलिसिसची सुविधा तालुकास्थळी असलेल्या रुग्णालयात करण्यात यावी, अशी मागणी पीडित रुग्णांकडून करण्यात आली आहे.
शरीरातील अनावश्यक घटक लघवीद्वारे शरीराबाहेर काढण्याचे काम किडनी हे अवयव करते. मात्र, बदलते हवामान, चैनीच्या वस्तूंचा अधिक वापर, व्यसनाधीनता आणि फास्ट फूड खाण्याने अनेक रोगांची निर्मिती झाली आहे. यात किडनी खराब होण्याचे आजार अनेकांना जडले आहेत. किडनी निकामी झाल्याने या रुग्णांना आठवड्यातून दोनदा डायलिसिस करून कृत्रिमरीत्या शरीरातील अनावश्यक पदार्थ काढून टाकावे लागतात. वर्धा जिल्ह्यात डायलिसिसची व्यवस्था केवळ जिल्हास्थळी आहे. रुग्णाची हेडसाळ थाबण्यासाठी तालुका स्तरावर सुविधा करण्याची मागणी नागरिकाकडून होत आहे.
रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांना सहकार्यही नाही किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या रुग्णांना वर्धा अथवा सावंगी येथे खासगी वाहनाने घेऊन जावे लागते. तर रोगाने जर्जर झालेल्या रुग्णांना रुग्णालयात भरती ठेवण्याचीदेखील सोय नाही. इतर रुग्णांना लागण अथवा इन्फेक्शन होईल, अशी कारणे देऊन रुग्णास घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे रुग्ण व त्याच्या कुटुंबाचा नाइलाज होतो. यातच रुग्णांना वेळेवर डायलिसिससाठी हजर करण्यात हयगय होऊन विपरित घटना घडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण परिसरातील रुग्णालयात सुविधा उपलब्ध करण्याची आवश्यकत आहे.
तालुका पातळीवर सुविधा उपलब्ध करा जिल्हास्तरावर रूग्णासाठी अनेक सुविधा आहेत. मात्र, ग्रामीण भागात आजही आरोग्याच्या सुविधा उपलब्ध झाल्या नाहीत. त्यामुळे ग्रामीण भागातील रूग्ण व त्याच्या नातेवाइकांची मोठी पायपीट होते. सोबचत आर्थिक नुकसान होत आहे. आर्थिक व होणारी पायपीट थाबण्यासाठी शासनाने तालुका पातळीवरील शासकीय दवाखान्यात ही सेवा सुरू करून द्यावी, अशी मागणी अनेक गरीब रुग्ण तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून करण्यात आली आहे.
अनियमिततेने ओढावला मृत्यू रोहना परिसरात सध्या अनिल सुपनर, वंदना बोंद्रे, प्रकाश हादवे, असे तीन किडनी आजाराचे रुग्ण आहेत. वनिता गलाट, सुरेश वाठोडे, प्रकाश शिबंदी, कुमार बुरघाटे, चंदू दाभेकर हे रुग्ण नुकतेच मृत झाले आहेत. यातील अनेक रुग्ण तरुण असून, कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. अनेक रुग्णांना वरचेवर वर्धा येथे डायलिसिसला नेणे आर्थिकदृष्ट्या शक्य झाले नाही; परिणामी त्यांच्या डायलिसिसमध्ये नियमितता न राहिल्याने दगावल्याची वस्तुस्थिती आहे. यामुळे ही मागणी पुढे येत आहे.
५ रुग्ण डायलिसिसच्या सोयीअभावी मृत पावले तालुका पातळीवर डायलिसिची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रोहाणा परिसरातील नागरिकांना वर्धा व अन्य ठिकाणी उपचार घेण्यासाठी जावे लागते. आशातच उपाचाराअभावी ५ रूग्णाचा मुत्यू झाला आहे.
"माझ्या किडनी निकामी झाल्या. त्यामुळे डायलिसिससाठी आठवड्यातून दोनदा सावंगी येथे जावे लागते. मी कुटुंबातील कमवता व्यक्ती होतो; पण मीच रुग्ण झाल्याने खासगी वाहनाने दवाखान्यात जाने जिकरीचे झाले आहे. त्यामुळे मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे."- प्रकाश हादवे, वाई, ता. आर्वी