प्रशासनाचे दुर्लक्ष : धरणाच्या भिंतीशेजारी होत आहे उत्खनन अरविंद काकडे आकोलीसेलू तालुक्यातील आकोली-आंजी (मोठी) मार्गावरील मदन उन्नई धरण परिसर अवैध गौण खनिज उत्खननाचे केंद्र झाले आहे. येथे धरणाच्या भिंती शेजारीच अवाढव्य खड्डा तयार करून शेकडो ट्रक मुरूमाची चोरी झाली आहे. या उत्खननामुळे भिंत ठिसूळ व पोकळ होण्याची शंका व्यक्त केली जात. धरणाच्या भिंती शेजारी सुरू असलेले उत्खनन असेच सुरू असल्यास मोठा अनर्थ होण्याची शंका नाकारता येत नाही.धरणाच्या भिंतीशेजारी कोणत्याही प्रकारचे खोदकाम करू नसे असा नियम आहे. मात्र येथे भिंतीलगतच खोदकाम होत असल्याने या भागात नियम धाब्यावर बसविले जात आहे. याकडे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असून गौण खनिज माफियांसाठी हा परिसर कुरण ठरला आहे. दिवस-रात्र या ठिकाणावरून ट्रक-ट्रॅक्टर द्वारे मुरूमाची अवैध चोरटी वाहतूक होत आहे. असे असताना पाटबंधारे विभागाचे संबंधित अधिकारी झोपेत असल्याचे दिसते. धरणाच्या भिंतीलगत शेकडो ट्रक मुरूम चोरून नेल्यामुळे शेततळ्यापेक्षा मोठा खड्डा तयार झाला आहे. पावसाळ्यात पाण्याने खड्डा भरून जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय धरणाची भिंत ठिसूळ होवून मोठा अनर्थ घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. येथून अहोरात्र मुरूमाची चोरटी वाहतूक होत असताना संबंधित शाखा अभियंता याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यांच्या डोळ्यावर कशाची झापड आहे, हे कळायला मार्ग नाही. याकडे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची माणगी धरणालगतच्या परिसरातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.
मदन उन्नई धरण धोक्यात
By admin | Updated: April 24, 2016 02:15 IST