द्वेषाला प्रेम अन् माणुसकी हेच उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 10:20 PM2019-04-20T22:20:07+5:302019-04-20T22:21:41+5:30

द्वेषाला उत्तर द्यायचे असेल तर प्रेमाची बाजू सशक्त करावी लागते, आज द्वेष करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. कारण प्रेम करणाऱ्यांची क्षमता कमी झाली आहे. माणुसकीच्या हत्यारापुढे काहीही टिकत नाही.

Love and humanity are the answer to hatred | द्वेषाला प्रेम अन् माणुसकी हेच उत्तर

द्वेषाला प्रेम अन् माणुसकी हेच उत्तर

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । सुरेश द्वादशीवार यांचे ‘गांधी समजून घेताना’ व्याख्यानमालेत प्रतिपादन

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : द्वेषाला उत्तर द्यायचे असेल तर प्रेमाची बाजू सशक्त करावी लागते, आज द्वेष करणाऱ्यांची संख्या वाढते आहे. कारण प्रेम करणाऱ्यांची क्षमता कमी झाली आहे. माणुसकीच्या हत्यारापुढे काहीही टिकत नाही. त्यामुळे आपल्यातली माणुसकी वाढवावी लागेल, असे उद्गार संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांनी ‘महात्मा गांधी आणि त्यांचे टिकाकार’ या विषयावर संवाद साधताना काढले. गांधी फॉर फ्युचर समितीद्वारे गांधी समजून घेताना व्याख्यानमालेत प्रा. द्वादशीवार यांची मुलाखत घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
सत्तेची सूत्रे कामगारांच्या हाती, गरिबांच्या हाती असावी ही गांधींची भूमिका होती. हिंदुत्ववादीही फाळणीसाठी गांधींना गुन्हेगार ठरवतात. गांधी स्वत:ला सनातनी हिंदू म्हणत असत. शिवाय त्याचवेळी ‘ईश्वर अल्ला तेरो नाम’ अशी समन्वयाची हाकही देत. विविध धर्मियांसोबत हिंदूही गांधींना आपला नेता मानत. हे हिंदुत्ववाद्यांचे मूळ दुखणे आहे. स्वातंत्र्यानंतरही १९६७ पर्यंत या देशातील हिंदुत्ववाद्यांना निवडणुकांमध्ये सहा टक्केही मते कधी मिळाली नाही. या देशातील हिंदू समाज टिळक, गांधी अगदी मौलाना आझाद यांच्यामागे गेला; पण गोडसे गोळवलकरांच्या मागे कधी गेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. आंबेडकरवादीही गांधींवर सतत टीका करतात, कारण गांधी त्यांनी कधी समजूनच घेतला नाही.
पुणे करारात डॉ. आंबेडकरांवर गांधींचा कोणताही दबाव नव्हता. गांधींचे उपोषण तर केवळ पाच दिवसांचेच होते. उलट त्याचा फायदा हा झाला की या देशातील सर्व मंदिरे त्या काळी दलितांसाठी खुली झाली. तुम्ही पुणे करार का केला? असा प्रश्न लुई फिशर या चरित्रकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विचारला असता त्यांचे उत्तर होते, ‘या जगात मला समजून घेणारा माणूस फक्त गांधी आहे. त्या माणसाला माझे माणूसपणही कळते आणि सामर्थ्यही कळते.’
व्याख्यानापूर्वी डॉ. सुभाष खंडारे लिखित ‘सत्याची हत्या’ या पुस्तकाचे प्रकाशन प्रा. द्वादशीवार यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी स्वागताध्यक्ष गंगाधर मुटे यांच्या हस्ते अतिथींचे चरखा, खादीवस्त्र आणि ग्रंथ भेट देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन पंकज वंजारे यांनी तर आभार तुषार पेंढारकर यांनी मानले.
क्रांतिकारकांबाबत पालकत्वाची भूमिका घेतली
या कार्यक्रमात डॉ. प्रमोद मुनघाटे (नागपूर) आणि प्रा. प्रशांत देशमुख यांनी द्वादशीवार यांची प्रकट मुलाखत घेत महात्मा गांधींच्या संदर्भातील जनमनातील विविध शंकांचे निरसन केले. सशस्त्र क्रांतिकारकांसंदर्भात गांधींवर होणाऱ्याआक्षेपांना उत्तर देताना प्रा. द्वादशीवार म्हणाले, वाट चुकलेले देशभक्त असा उल्लेख करणाऱ्या गांधींची या क्रांतिकारकांबाबत भूमिका नेहमीच पालकत्वाची होती. गांधी आदर्श आहेत; पण अनुकरणीय नाही, अशी नवी पिढी म्हणते. या संदर्भात उत्तर देताना द्वादशीवार म्हणाले, आदर्श हा पुस्तकात ठेवायचा नसतो तर तो अनुसरायचा असतो. ज्यांना अनुकरण करता येत नाही त्यांनी आपले दुबळेपण मान्य केले पाहिजे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश अशा अनेकांच्या हत्या झाल्यात त्या उगाच झाल्या आहेत का? आपल्यात सामर्थ्य नाही म्हणून ते इतरांमध्येही नाही, असे म्हणता येणार नाही, असे ते म्हणाले.

Web Title: Love and humanity are the answer to hatred

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.