आर्वी : वीज वितरण कंपनीत रोहित्र व एबी स्वीचची नियमित दुरूस्ती केली जात नाही़ यामुळे वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा होत आहे़ वेळी-अवेळी वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे़ वीज कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देत कारवाई करावी, अशी मागणी होत आहे़ रोहित्र व एबी स्वीचची नियमित दुरूस्ती केली जात नाही़ यामुळे ग्राहक व वीज कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे़ प्रत्येक महिन्यात रोहित्रात बिघाड होतो़ यामुळे विजेचा खेळखंडोबा होतो़ वर्षाकाठी एका विभागातील रोहित्राचे अर्थिंग व एबी स्विच देखभाल, दुरूस्ती कामाचे कंत्राट एक कोटीच्या घरात असते. अर्थिंग व देखभालीसाठी हा पैसा खर्च होतो तर वारंवार रोहित्रात बिघाड का येतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ वीज कंपनीतील सर्व कामे कंत्राटदारांमार्फत केली जात असल्याने दर्जा राहत नसल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी आहेत. यामुळे आर्वीतील अनेक भागांत विजेचा भार कमी-अधिक होत असून विद्युत उपकरणांत बिघाड येतो़ परिणामी, नागरिकांना अकारण भुर्दंड सोसावा लागतो़वीज वितरण कंपनीत ८० टक्के कामे ठेकेदारी पद्धतीवर दिली जात असून दर्जा तपासला जात नाही़ यामुळे ती निष्कृष्ट दर्जाची होत असून काही बिघाड झाल्यास कंत्राटदार त्या कामावर तातडीने लक्ष देत नाही. विशिष्ट कंत्राटदाराला दिलेली कामे ‘इंन्फ्रा’ या वितरण कंपनीत कार्य करणाऱ्या स्वतंत्र यंत्रणेकडे दिली जातात़ त्यावर संबंधित वितरण कंपनीचे अभियंते व संबंधित विभाग मंडळ अधिकाऱ्यांकडे असते; पण काम सुरू असताना त्या कामाचा दर्जा तपासण्यासाठी संबंधित अधिकारी फिरकत नसल्याची ओरड आहे. विज कंपनीेने ठरवून दिलेल्या मानकानुसार त्या कामाची वर्कआॅर्डर दिली जाते; पण केवळ ३० ते ४० टक्केच कामाचा दर्जा सांभाळला जातो. हा प्रकार रोखणे गरजेचे आहे़(तालुका प्रतिनिधी)
रोहित्रातील बिघाडांमुळे विजेचा खेळखंडोबा; ग्राहक त्रस्त
By admin | Updated: November 29, 2014 02:01 IST