‘धाम’मधून सोडणार अखेरचे उपयुक्त जल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:44 PM2019-05-26T23:44:08+5:302019-05-26T23:44:39+5:30

महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून वर्धा नगर परिषद तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन संस्था वर्धा शहरातील व परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करतात. असे असले तरी सध्या याच धाम प्रकल्पात ३ दलघमी इतकाच नाममात्र उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे.

Last useful water to leave Dham | ‘धाम’मधून सोडणार अखेरचे उपयुक्त जल

‘धाम’मधून सोडणार अखेरचे उपयुक्त जल

Next
ठळक मुद्दे३ दलघमी पाणी : मृतसाठ्याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : महाकाळी येथील धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून वर्धा नगर परिषद तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या दोन संस्था वर्धा शहरातील व परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यायोग्य पाण्याचा पुरवठा करतात. असे असले तरी सध्या याच धाम प्रकल्पात ३ दलघमी इतकाच नाममात्र उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. तो येत्या जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे सोडण्यात येणाऱ्या पाण्याची या दोन्ही संस्थांनी वेळीच साठवणूक करणे तसेच नागरिकांकडूनही पाण्याचा काटकसरीनेच वापर होणे गरजेचे आहे.
आर्थिक वर्ष २०१७-१८ व २०१८-१९ च्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने महाकाळी येथील धाम प्रकल्पाच्या पाणी पातळीत पाहिजे तशी वाढ झाली नाही. त्यातच मार्च महिन्यात भूगर्भातील पाणी पातळीत झपाट्याने घट झाल्याने अनेक विहिरी व बोअरवेल कोरड्या होण्यास सूरूवात झाली. परिणामी, पाण्याचा प्रश्न पेटत गेला. याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेवरून उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन करण्यात आले. शिवाय सिंचनासाठी कुठल्याही परिस्थितीत प्रकल्पातील पाणी सोडण्यात येणार नसल्याचे निश्चित करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून धाम मधील पाणी जून अखेरपर्यंत महिन्यातून एकदाच सोडण्याचा निर्णयही घेण्यात आला. शिवाय त्यावर वर्धा पाटबंधारे विभागाच्यावतीने प्रभावीपणे अंमलबजावणीही करण्यात आली. सध्या स्थितीत वर्धा शहरासह परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी फायद्याच्या ठरणाºया धाम प्रकल्पात केवळ ३ दलघमी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. हा उपयुक्त जलसाठा जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सदर प्रकल्पातून सोडण्यात येणार आहे. सोडण्यात येणारे पाणी सुमारे १५ दिवस या दोन्ही संस्थांना पुरेल असा अंदाज आहे. तर जून च्या दुसºया आठवड्यापर्यंत समाधानकारक पाऊस न झाल्यास धाम प्रकल्पातील मृत जलसाठ्याचा उपसा करण्याचे जिल्हा प्रशासनासह वर्धा पाटबंधारे विभागाच्या विचाराधीन आहे. धाम मधील मृत जलसाठ्याचा उपसा करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून तो मंजूरीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यावर अद्यापही शिक्कामोर्तब झालेला नसल्याचे सांगण्यात येते. तर कुठला लोकप्रतिनिधी हा विषय तातडीने मार्गी काढण्यासाठी पुढाकार घेतो याकडे साºयांचे लक्ष लागले आहे.

उद्योगांच्या मागणीला लावली ६० टक्क्यांनी कात्री
धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल वर्धा न.प. व मजिप्रा प्रशासन, उत्तम गाल्वा कंपनी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ वर्धा, मध्य रेल्वे प्रशासन व जामणी येथील मानस अ‍ॅग्रो इंडस्ट्रिज अ‍ॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर लि.मि. या संस्था करतात. नाममात्र पाणी जलाशयात असल्याने त्यांच्या मागणीपेक्षा ६० टक्के पाणी कमी दिले जात आहे.

३४ हजार कुटुंबांची भागविली जाते पाण्याची गरज
धाम प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्याची येळाकेळी व पवनार येथील धाम नदीपात्रातून उचल करून वर्धा नगरपरिषद प्रशासन त्यांच्या कार्यक्षेत्रातील तब्बल १६ हजार कुटुंबीयांना नळयोजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा करते. इतकेच नव्हे, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण वर्धा शहराशेजारील १३ गावांसह आंजी (मोठी) या गावातील १८ हजार कुटुंबाला धाम मधून सोडण्यात आलेल्या पाण्याची उचल करून नळ योजनेद्वारे पाणी पुरवठा करते. एकूणच धाम प्रकल्प सुमारे ३४ हजारांवर कुटुंबांची पिण्याच्या पाण्याची गरज भागवते.
जूनच्या पहिल्या आठवड्यात सोडणार पाणी
धाम प्रकल्पातील उपयुक्त जलसाठ्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यानुसार आता जूनच्या पहिल्या आठवड्यात पाणी सोडले जाईल.

७ हजार ३२ घनमीटर काढला गाळ
भविष्यातील जलसंकटावर मात करण्याच्या उद्देशाला केंद्रस्थानी ठेवत महाकाळी येथील धाम प्रकल्प गाळमुक्त करण्याचे काम जिल्हा प्रशासनाने हाती घेतले आहे.
१ मे रोजी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांच्या हस्ते या कामाचा श्रीगणेशाही करण्यात आला आहे.
सद्यस्थितीत धाम प्रकल्पातून ७ हजार ३२ घ.मी.च्यावर गाळ काढण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Last useful water to leave Dham

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.