धीरज देवतारेलोकमत न्यूज नेटवर्कझडशी : येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश कुनघटकर यांनी गावरान पपईचे उत्पन्न घेत तब्बल ३ लाखांचा नफा कमविला आहे. प्रकाश यांचा हा यशस्वी प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.प्रकाश यांच्या वाट्याला वडिलोपार्जित ०.७७ हे.आर. शेतजमीन आली. सुरुवातीला या शेतात सिंचनाची सोय नव्हती, शिवाय प्रकाशही आर्थिकदृष्ट्या कमकुवत होता. त्याने सुरुवातीला सालगडी म्हणून चाकरी केली. त्यातून पैशाची जुळवाजुळव करून शेतात विहीर खोदत सिंचनाची सोय केली. पपई लागवडीपूर्वी त्याने कपाशी, चणा, गहू, सोयाबीन अशी पारंपरिक पिके घेतली, पण त्यातून पाहिजे तसे उत्पन्न न मिळाल्याने आपणही शेतीत काहीतरी नवीन प्रयोग करू, असे निश्चित केले. ग्रामसभेत कृषी सहायक एस.एम. महाकाळकर यांच्याशी त्याची भेट झाली. चर्चेत पपई किंवा केळी लागवडीबाबत त्यांना प्राथमिक मार्गदर्शन मिळाले. अखेर पपई लागवड करण्याचे ठरवून गावरान पपईची लागवड ०.२२ हेक्टरवर करण्यात आली. योग्य निगा घेतल्याने सहा महिन्यांत पपईची झाडे फुलावर आली. लागवडीपासून सुमारे नऊ महिन्यांत पहिला तोडा निघाला. तेव्हापासून सरासरी १० दिवसांच्या अंतराने १२ महीने तोडा सुरू होता. पपई विक्रीसाठी मुलगा समीर याची मदत प्रकाशला झाली. सेलू, वडगाव आदी गावात दुचाकीने जाऊन पपईची विक्री करण्यात आली. नागरिकही प्रकाशने उत्पादित केलेल्या पपईची प्रतीक्षा करायचे. पपई विक्रीच्या काळात जास्तीतजास्त ३५ तर किमान १० रुपये किलो भाव मिळाला. एकूणच ४ लाखांचे उत्पन्न प्रकाशला मिळाले. सर्व खर्च वजा जाता, तीन लाखांचा निव्वळ नफा त्याने कमविला आहे.
खापरीत मिळाले बियाणेगावरान पपई बाजारपेठेत कमी येत असल्याने, त्याचीच लागवड करण्याचे प्रकाशने निश्चित केले, पण अडचण होती, ती गावरान पपईच्या बियाण्याची. काहींना विचारणा केल्यावर खापरी येथील प्रमोद उडान यांच्याकडे बियाणे असल्याची माहिती प्रकाशला मिळाली. त्यांनी उडान यांच्याकडून बियाण्यांची खरेदी करून गावरान पपईची लागवड केली. दहा ते बारा झाडांमागे एक पपईचे नर झाड लावले, तर उर्वरित नर झाडे उपटून टाकली.