सेलू : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक पदाचा कार्यकाळ केव्हाच पूर्ण झाला. दोन वेळा निवडणूक लांबणीवर टाकण्यात आली. आता कधीही निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. महत्त्वपूर्ण मानली जाणारी तालुक्यातील सिंदी कृउबा समितीची निवडणूक यंदा कशी होणार आणि सहकार गटाची युती कुणाशी होणार, याचीच उत्सुकता अनेकांना लागल्याचे दिसते़ सहकार नेते सुरेश देशमुख व स्थानिक जयस्वाल गट यांच्या युतीतून ही निवडणूक काँग्रेसच्या शेंडे गटाविरूद्ध मागील वेळी लढली गेली़ यात सहकार व जयस्वाल गटाने युतीतून सत्ता काबीज केली. सिंदी कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सेलू उपबाजारपेठ आहे. सहकार गटाचा सभापती व जयस्वाल गटाचा उपसभापती, अशी सत्ता विभागून आजपर्यंत बाजार समितीचा कार्यभार चालत आला़ सेलू उपबाजारपेठ असली तरी सिंदीपेक्षा सेलूचेच उत्पन्न अधिक आहे. केवळ उत्पन्नापोटी म्हणजे धान्य व कापूस यांच्या विक्रीतून शेष पोटी बाजार समितीला यंदा सुमारे १ कोटी ३५ लाख रुपये मिळाले. यामुळे सोन्याची अंडी देणारी कोंबडी आपल्याच अंगणात असावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ विधानसभेत जयस्वाल गटाने सुरेश देशमुख यांचे समर्थन काढून काँग्रेसचे शेखर शेंडे यांना दिले. यात दोन्ही उमेदवारांना मतदारांनी पराभव नाकारले़ यामुळे देशमुख-जयस्वाल युती तुटली. बाजार समितीच्या निवडणुकीतही सहकार गटाच्या या जखमा ताज्याच राहतील़ यामुळे जयस्वाल व शेखर शेंडे यांच्या गटात युतीतून बाजार समितीची निवडणूक होऊ शकते़ भाजपाला आमदारकी मिळाल्याने बाजार समिती त्यांनाही हवी असेल, हे नाकारता येणार नाही़ बाजार समितीच्या येत्या निवडणुकीत सहकार गट स्वतंत्र लढते की कुणाशी युती करणार, याचीच उत्सुकता नागरिकांत दिसते़(तालुका प्रतिनिधी)
कृउबास निवडणूक; सहकार गटाच्या युतीचे औत्सुक्य
By admin | Updated: October 29, 2014 22:53 IST