रबी हंगामाला लवकरच सुरुवात : वेळपर्यंत सफाई होत नसल्याची ओरडवर्धा : जिल्ह्यात सर्वत्र खरीप व कोरडवाहू शेतांमधील कपाशी बोंडावर आली आहे. सोबतच सोयाबीनही सवंगणीवर आले आहे. त्यामुळे काहीच दिवसात खरीप सरून रबी पिकांच्या पेरणीला सुरुवात होणार आहे. असे असतानाही जिल्ह्यातील बहुतेक कालव्यांची सफाई अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे पाटबंधारे विभागाचे याकडे होत असलेले दुर्लक्ष पाहून शेतकरी संताप व चिंता व्यक्त होत आहे. खरीप सरण्यावर आला आहे. काहीच दिवसांत रबी हंगाम सुरू होईल. त्यामुळे लवकरच रब्बीतील पिकांच्या पेरणीलाही सुरुवात होईल. रबी पिके ही पूर्णत: सिंचनाच्या सोयीवर अवलंबून असते. त्यामुळे यांच्या शेतात सिंचनाची सोय आहे असेच शेतकरी गहू, हरभरा, चना आदी पिकांची पेरणी करतात. रबीचा जिल्ह्यातील पेरा वाढावा यासाठी बोर, धाम, पंचधारा, मदन उन्नई, उर्ध्व वर्धा, निम्न वर्धा आदी सिंचन प्रकल्पांतून कालवे काढून सिंचनाचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. खरीपामध्ये सिंचनाची गरज नसल्याने या काळात कालवे आणि त्यातील पाटसऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झुडपी झाडे उगवितात. रबी हंगाम सुरू होण्यापूर्वी या कालव्यांची व पाटसऱ्यांची स्वच्छता होणे गरजेचे आहे. परंतु अद्यापही या कामांना पातबंधारे विभागाने सुरुवात केलेली नाही. कालव्यांची सफाई न केल्यास पाणी शेवटपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे कालवा असूनही पआणी पोहोचत नसल्याने शेतकरी तक्रारी करतात. या सर्व बाबींची दखल घेत सर्वच कालव्यांच्या व पाटसऱ्यांच्या दुरुस्तीची मोहीम हाती घेण्याची मागणी शेतकरी करीत आहे.(शहर प्रतिनिधी)
खरीप सरला तरी कालव्यांची दैनाच
By admin | Updated: October 1, 2015 02:57 IST