युवक-युवतींचा भगचे फेटे घालून समावेश वर्धा : येत्या रविवारी येथे आयोजित मराठा - कुणबी क्रांती मूकमोर्चाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहरातून भव्य आवाहन रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये भगवे फेटे बांधलेल्या तरुण-तरुणींचा उत्स्फूर्त सहभाग या मूकमोर्चाच्या भव्यतेचा परीचय देत होता. पिपरी(मेघे) परिसरातील शनी मंदिराच्या परिसरातून ही आवाहन रॅली निघाली. एका दुचाकीवर दोघेजण, एकाच्या हातात भगवा झेंडा, सर्वात पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे तैलचित्र असलेले वाहन असे या आवाहन रॅलीचे स्वरुप होते. या रॅलीला दुपारी ३ वाजता प्रारंभ झाल्यानंतर ती आर्वी नाका चौकात पोहचली. येथून बॅचलर रोड मार्गे वंजारी चौक, नंतर गर्जना चौक मार्ग पँथर चौक. तेथून रेल्वे स्थानक मार्गे बजाज चौक आणि मुख्य मार्गाने शिवाजी चौकात ही रॅली पोहचली. येथून आरती चौक मार्गे शासकीय विश्राम गृह मार्गे नालवाडी चौक आणि धुनिवाले मठ चौक मार्गे भ्रमंती करीत रॅली शिवाजी चौकात पोहचली. यानंतर येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. अतिशय शिस्तबद्धपद्धतीने शहराच्या कानाकोपऱ्यात पोहचलेली रॅली नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. रविवारी येथील जुने आरटीओ मैदानावरुन दुपारी १२ वाजता मराठा-कुणबी क्रांती मूकमोर्चा निघणार आहे. यामध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, यासाठी निघालेल्या या आवाहन रॅलीने शहरात मूकमोर्चाची वातावरण निर्मिती केली.(प्रतिनिधी)
आवाहन रॅलीने मराठा-कुणबी मूकमोर्चाचा जागर
By admin | Updated: October 21, 2016 01:55 IST