नागरी सुविधांचा अभाव : विकासकामांचा प्रस्तावही नाही सुधीर खडसे समुद्रपूररस्ता ना वीज, पाणी ना इतर सुविधा, अशा परिस्थितीत जगावे कसे, असा प्रश्न करीत समुद्रपूर नगर पंचायत हद्दीतील इटलापूरवासीयांनी वस्ती सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अनेकांनी या निर्णयाची अंमलबजावणीही केली आहे. असे असताना या गावाच्या विकासाकरिता पालिका प्रशासनाकडून कुठलेही पाऊल उचलले गेले नाही. ग्रामपंचायतीला नगर पंचायतीचा दर्जा मिळताच विकासाकरिता पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. त्याच्या खर्चाचा प्रस्तावही तयार करण्यात आला आहे; मात्र या प्रस्तावात गत ३० वर्षांपासून विकासाची प्रतीक्षा करीत असलेल्या या गावाकरिता कुठलाही विकास करण्याचा उल्लेख नाही. यामुळे येथील प्रशासनालाही या गावाचा विकास साधावा असे वाटत नसल्याचा आरोप गावकऱ्यांकडून होत आहे. समुद्रपूर नगर पंचायत मतदार संघातील इटलापूर हे गाव नागरी सोई सुविधांअभावी रिकामे होण्याच्या मार्गावर आहे. १९८५ मध्ये रमेश भोयर सरपंच असताना येथे एक कुपनलिका व सोर उर्जेवर चालणारे दिवे देण्यात आले होते. त्या वेळी या गावाची लोकसंख्या १५० च्या आसपास होती. आजच्या स्थितीत येथील कुपनलिका कोरडी पडली आहे. पाण्याची गरज भागविण्याकरिता नागरिकांना दोन किलोमीटरचा फेरा करावा लागत आहे. गावात येण्याकरिता रस्त्याची सोय नाही. पावसाळ्यात रस्त्यावर होत असलेल्या चिखलातुन माणसाला सोडा जनावरांनाही चालने कठीण जाते. विजेची सोय नाही. अशा एका ना अनेक समस्या असलेल्या या गावात आज केवळ सात घरांची वस्ती शिल्लक राहिली आहे. इतर लोक बाहेर गावाला वस्ती करून वास्तव्यास आहेत. या ३० वर्षांपासून या गावात नागरी सोई सुविधा देण्याची मागणी होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने आतापर्यंत अनेक कुटुंबांनी या गावाचा निरोप घेतला आहे.
इटलापूरवासीयांचा वस्ती सोडण्याचा निर्णय
By admin | Updated: April 29, 2016 02:01 IST