श्रीशजी देवपुजारी : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये ‘वैश्विक समस्यांचे समाधान’ विषयावर व्याख्यानहिंगणघाट : विकास हा भौतिक सुखात नसून तो आंतरिक आध्यात्मिकतेने मिळणाऱ्या आंतरिक सुखात आहे. हे आध्यात्मिक सुख भारतीय प्राचीन धर्म ग्रंथात आहे व ते ग्रंथ संस्कृत भाषेत आहे. प्राचीन शास्त्र अधिक प्रगत असून प्राचीन खजिना उलगडण्यासाठी संस्कृत भाषेची कास धरा, असे आवाहन संस्कृत भारतीचे अखिल भारतीय संघटनमंत्री श्रीशजी देवपुजारी यांनी केले. आज जगापुढे पर्यावरण व दहशतवाद या दोन मुख्य समस्या आहे, असे सांगताना देवपुजारी म्हणाले की, भौतिक विकासाच्या चुकीच्या विचाराने आम्ही जगात प्रचंड प्रदूषण निर्माण करीत आहोत. आवश्यकता नसताना मानव जुन्या वस्तू फुंकून नवीन वस्तू खरेदी करीत आहे. या वस्तू खरेदी केल्याने आपला भौतिक विकास झाला, असे समजतात. या आर्थिक विकासाच्या सुत्रामुळे रोज उत्पादन सुरू आहे. यामुळे आकाशात विषारी वायू, विषारी रसायणे, नदी, तलाव, समुद्रात सोडत आहे. रोजच्या कचऱ्यामुळे वसुंधरा प्रदूषित झाली आहे. जगातील प्रगतशील देश वातावरणात सर्वाधिक प्रदूषण निर्माण करीत आहे. ते आपल्या भौतिक सुविधांचे उत्पादन वाढविताना प्रदूषणाकडे दुर्लक्ष करताना आपल्या वाट्याचे प्रदूषण कमी करण्याचे दायित्व लाहन देशांकडे देतात. हा सर्व विनाश पाश्चिमात्य तत्वज्ञानामुळे होत आहे. ही समस्या सोडविण्याची खरी ताकद भारतीय तत्वज्ञानात आहे; पण हे ज्ञान संस्कृत असल्याने आपल्याला संस्कृत भाषा अवगत झाली पाहिजे. तरच आपण जगाला योग्य मार्गदर्शन करून जगाच्या समस्या सोडवू. दशहतवाद यावर बोलताना देवपुजारी म्हणाले की, सर्व धर्मातील लोकांनी आपले संप्रदाय, धार्मिक ग्रंथ, मांडलेले धार्मिक तत्वज्ञान व धार्मिक श्रद्धास्थान हेच जगात श्रेष्ठ आहे. या अतिरेकी विचारामुळे जगात दहशतवाद निर्माण झाला आहे. मूळात सर्व धर्म ग्रंथात समानतेचे व अहिंसेचे विचार मांडले आहे; पण काही प्रवृत्तीने आपलेच विचार तत्वज्ञान जगात श्रेष्ठ व बाकी दुय्यम आहे, आपल्या विचाराच्या प्रतिकूल विचारांना नष्ट करायचे यातून दशहतवाद निर्माण झाला. या समस्या सोडविण्याची ताकद फक्त भारताकडे आहे. यासाठी भारतीय धर्मग्रंथांचा अभ्यास करावा व तसे जीवन जगावे, तरच संपूर्ण जग समस्यामुक्त होईल. यासाठी आधुनिक शास्त्रापेक्षा प्राचीन शास्त्राचे शास्त्रायान करून संस्कृत भाषेची कास धरा, असे आवाहनही त्यांनी केले.(तालुका प्रतिनिधी)
आंतरिक आध्यात्मिक सुखात मानवी प्रगतीचे मापदंड
By admin | Updated: December 20, 2015 02:12 IST