खरिपाने दिला दगा : नापिकीच्या अवस्थेत कर्ज फिटता फिटेना; शेतकरी चिंतातुरवायगाव (निपाणी) : यंदाच्या खरीपात शेतकऱ्यांच्या माथी आलेल्या नापिकीने त्याला चांगलेच जेरीस आणले. येथील एका शेतकऱ्याने त्याच्याकडे असलेल्या पाच एकरात ४२ हजार ३५० रुपये खर्च करून सोयाबीनचा पेरा केला. या पाच एकरात त्याला केवळ चार हजार ५०० रुपयांचे उत्पन्न झाले. या उत्पन्नात घेतलेले कर्ज फेडावे वा इतर खर्च करावा असा प्रश्न त्याला पडला आहे. ही अवस्था कमी अधिक फरकाने जिल्ह्यात एकाची नाही तर अनेकांची आहे. वर्धा तालुक्यातील वायगाव (नि.) येथील शंकर श्यामराव टोपले यांनी आलोडा (बोरगाव) शिवारातील त्यांच्या शेताता सोयाबीनचा पेरा केला. त्यांच्याकडे पाच एकर शेती आहे. त्यांनी मशागतीपासून तर उत्पादन घरात येईपर्यंत ४२ हजार ३५० रुपये खर्च केला. शेतातील सोयाबीनची सवंगणी करून त्याच्या घरात केवळ चार हजार ५०० रुपयांचे उत्पन्न आले. यामुळे त्यांच्या समोर अनेक समस्या उभ्या ठाकल्या आहेत. जिल्ह्यात उत्पन्नात तोटा येणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या भरपूर आहे. त्यामुळे संबंधित विभागाने अशा शेतकऱ्यांची यादी तयार करून त्यांना नुकसान भरपाई तसेच कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत आहे.कमी खर्चात भरपूर उत्पन्न देणारे पीक म्हणून सोयाबीनकडे पाहिले जात होते. मात्र निसर्गाच्या अवकृपेने ती परिस्थिती यंदा उलट झाली. शेंगा भरण्याच्या काळात पावसाने दडी मारल्याने ज्वारीच्या दान्याएवढे सोयाबीन झाले. बँकाचे कर्ज काढून घेतलेल्या सोयाबीनच्या उत्पन्नात आलेला तोटा हा शेतकऱ्यांना आणखीच अडचणीत आणणारा ठरला. पूर्वी शेतकरी सोयाबीनचे उत्पन्न घेत होता. तणनाशक उपलब्ध नसतानाही हजारो रुपये निंदन व डवरणीसाठी खर्च करूनही किमान एकरी आठ ते १० क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न निघत होते. एकरी उत्पादन खर्च २० हजाराच्या जवळपास गेल्यास ४० हजारापर्यंत उत्पादन होत होते. मात्र या यंदाच्या हंगामात त्याच्या उलट झाले. (वार्ताहर)
४२,३५० रुपयांच्या खर्चात ४,५०० रुपयांचे उत्पन्न
By admin | Updated: December 7, 2014 22:55 IST