प्रवीण देशमुख : जिल्हा कारागृहात सप्तखंजेरी वादन व मार्गदर्शन कार्यक्रमवर्धा : कैदी बांधवांनो, तुमच्या हातून ज्या चुका झाल्या त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागत आहे. येथून सुटका झाल्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता जीवनात उतरवा. ग्रामगीतेतील प्रत्येक शब्द तुमच्या जीवनाला चांगली दिशा देईल. भविष्यात कोणत्याही चुका होणार नाही, असा संकल्प करून चारित्र्यवान नागरिक बनण्याचा विचार स्वत:च्या अंत:करणात खोलवर रूजवा. तुमच्या पत्नी व मुलांबाळांना चांगल्या संस्काराचे सानिध्य द्या. व्यवसायापासून सदैव चार हात दूर राहा, असा उपदेश सप्तखंजेरी वादक व राष्ट्रसंताच्या कार्याचे प्रेरक प्रवीण देशमुख (सुरगाव) यांनी केला.वर्धा जिल्हा कारागृहात २५० कैदी बांधवाना सामाजिक प्रबोधनातून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता पटवून देताना वाट चुकलेल्या माणसाला वाटेवर आणण्याचे काम ग्रामगीतेतून होते, असे सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारागृह अधीक्षक बावीस्कर होते. येथे आलेले प्रत्येक कैदी काहीतरी चुकल्यामुळे शिक्षा भोगत आहे. यामुळे संसारापासून दूर राहण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कोणतेही व्यसन, क्रोध माणसाला येथे येण्यास बाध्य करते. अशा चुकाच जीवनात होणार नाही, असे संस्कारक्षम जगा असा मार्मिक सल्लाही प्रवीण देशमुख यांनी प्रबोधनातून दिला. वंदनीय तुकडोजी महाराजांच्या भजनाला सप्तखंजेरीची साथ देत व अधून-मधून सामाजिक व्यंगाला चिमटे काढत देशमुख यांनी प्रबोधनासोबतच मनोरंजनही केले. दु:खी अपराधी चेहऱ्याच्या कैदी बांधवांच्या चेहऱ्यावर प्रचंड हशा निर्माण करण्याचे कामही या प्रबोधनातून झाले. प्रत्येक माणसाने आंत:बाह्य स्वच्छ राहिल्यास अपराध होतच नाही. यामुळे सर्वांनी ग्रामगीता आचरणात आणण्याचा संदेशही आपल्या प्रबोधनातून देशमुख यांनी दिला.(कार्यालय प्रतिनिधी)
राष्ट्रसंतांचे विचार आत्मसात केल्यास जीवन पूर्वपदावर येईल
By admin | Updated: November 10, 2015 02:51 IST