लोकमत न्यूज नेटवर्कसमुद्रपूर : हिंगणघाट नंदोरी, कोरा, या मार्गासाठी चार वर्षापूर्वी आमदार समीर कुणावार यांच्या प्रयत्नांतून १७५ कोटी रुपये निधी उपलब्ध करून दिला. मात्र, अल्पावधीतच या मार्गाची दैनावस्था झाली असून, ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या प्रकारामुळे नागरिकांनी संपात व्यक्त केला असून, भाजपच्या नेतृत्वात तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
हिंगणघाट नंदोरी, कोरा, खडसंगी या मार्गासाठी शासनाने १७५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. या रस्त्याचे काम पगारिया कन्स्ट्रक्शन यांना देण्यात आले होते. चार वर्षापूर्वी या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली; मात्र अद्यापही पूर्ण झाले नाही. या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू पूर्ण झालेल्या रस्त्यावर अल्पावधीतच ठिकठिकाणी खड्डे पडले.
आठवड्याचा दिला अल्टिमेटमनागरिकांनी अधिकाऱ्यांना भर रस्त्यावर प्रश्नांचा भडिमार केला. संबंधित ठेकेदारांना तत्काळ या रस्त्याचे उत्कृष्ट दर्जाचे काम करण्यास सांगा, अन्यथा आठवडाभरात या रस्त्यावर गावातील लहान-मोठ्या नागरिकांना सोबत घेऊन नंदोरी चौकात तीव्र आंदोलन करू, असा इशारा दिला. या आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडल्यास यास मुख्य कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे व कंत्राटदार पगारिया जबाबदार राहतील, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य रोशन चौके, माजी पंचायत समिती सदस्य वसंत घुमडे, माजी सरपंच किशोर नेवल, मनोज बारस्कर, मोहन बाकरे, अरुण चौधरी, सुभाष लभाने, हेमंत राऊत, गुलाब चिंचुलकर, अनिल कावडे, चिंतामण राऊत, गावकरी उपस्थित होते.
आठ महिन्यांत रस्त्याची चाळणया रस्त्याचे काम अत्यंत सुमार दर्जाचे असल्यामुळे आठ महिन्यांमध्ये या रस्त्याची चाळण झाली आहे. त्यांना पॅचेस लावण्याचे काम करावे लागले. पगारिया नामक कन्स्ट्रक्शन कंपनीला रस्त्याच्या कामाचा कोणत्याही अनुभव नसताना कोणत्या आधारावर या कंपनीच्या निविदा मंजूर करण्यात आल्या, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी
- या कामासंदर्भात ग्रामस्थांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किशोर दिघे यांच्याकडे रस्त्याची माहिती दिली असता त्यांनी रस्त्याची घटनास्थळी जाऊन पाहणी केली.
- सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे व उपविभागीय अभियंता सतीश धमाणे यांना घटनास्थळी बोलविले. त्यांना मार्गाची स्थिती दाखवीत चांगलेच धारेवर धरत कानउघाडणी केली.
- यावेळी अभियंत्यांनी सरकारमधील वेगवेगळ्या नेत्यांची नावे सांगून उडवाउडवीची उत्तरे दिली.