वैद्यकीय जनजागृती मंचचा उपक्रम : नववर्षांची उबदार भेट वर्धा : वाढत्या थंडीत रस्त्यांच्या कडेने, रेल्वे स्थानक, बस स्थानक, रुग्णालय, फुटपाथ, मंदिर परिसर अशा अनेक ठिकाणी लोक हुडहुडी भरलेल्या स्थितीत रात्र काढतात. अशा लोकांना उबदार भेट देण्यासाठी दोन वर्षांपासून वैद्यकीय जनजागृती मंचाकडून उपक्रम राबविला जात आहे. शनिवारीही रात्री मंचाच्या सदस्यांनी फिरून थंडीने गारठलेल्या नागरिकांना गरम कपडे व ब्लँकेटचे वितरण केले. नववर्षाचे स्वागत करण्यास सज्ज असलेल्या समाजात बरेच संकल्प करण्याची पद्धत आहे. दोन वर्षांपासून वैद्यकीय जनजागृती मंच बोचऱ्या थंडीत गारठलेल्या जीवांचे शुभाशीर्वाद गरम कपड्यांचे वाटप करून मिळवित आहे. यंदाही शनिवारी मध्यरात्री हा उपक्रम वैद्यकीय जनजागृती मंचाने गरम कपडे व ब्लॅकेट वाटप करून राबविण्यात आला. वर्धेकर जनतेला या उपक्रमासाठी गरम कपडे, ब्लँकेट द्यावयाचे असल्यास ते स्वच्छ धुवून जमा करून या समाजसेवी उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मंचाचे अध्यक्ष डॉ. सचिन पावडे यांनी केले. या उपक्रमात डॉ. पावडे, डॉ. यशवंत हिवंज, डॉ. प्रदीप सुने, डॉ. आनंद गाढवकर, डॉ. प्रशांत वाडीभस्मे, डॉ. प्रवीण सातपुते, डॉ. नितीन मेशकर, श्याम भेंडे, मोहन मिसाळ, अमोल गाढवकर, आगाज युवा मंचचे विशाल व हेमंत आदींनी सहभागी होत सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)
गरम कपडे व ब्लॅकेट वाटप
By admin | Updated: January 2, 2017 00:13 IST