वर्धा : केंद्र प्रमुखाद्वारे मानसिक त्रास देऊन स्वेच्छानिवृत्ती घेण्याचे दडपण आणले जात असल्याचा आरोप येसंबा येथील जि़प़ प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने केला आहे़ याबाबत वर्धा गटशिक्षणाधिकारी व शिक्षणाधिकारी यांच्याकडे तक्रारही करण्यात आली आहे़ या प्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी सदर मुख्याध्यापिकेने केली आहे़ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येसंबा येथे छाया प्रभाकर भंडारवार मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहेत़ ही शाळा मदनी केंद्रांतर्गत येत असून केंद्रप्रमुख पदावर सुनील पावडे कार्यरत आहेत़ सदर केंद्र प्रमुख शाळेत येऊन मोठ्या आवाजात बोलतात, गैर शब्दांचा वापर करतात, नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेण्यासाठी मानसिक त्रास देत असल्याचे भंडारवार यांनी तक्रारीत नमूद केले आहे़ २१ जानेवारी रोजी केंद्र प्रमुख पावडे यांनी मुख्याध्यापिकेला त्यांच्या पतीसह स्वत:च्या घरी बोलविले़ यावेळी शाळेत तुमचे काम चांगले नाही व तुमच्यावर कारवाई करतो, अशी धमकावणी केली़ यानंतर पाच हजार रुपयांची मागणी केली़ मानसिक दडपणात येऊन त्यांना ५ हजार रुपये दिल्याचेही मुख्याध्यापिकेने तक्रारी नमूद केले आहे़ या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी मुख्याध्यापिकेने गटशिक्षणाधिकारी यांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
केंद्रप्रमुखाने मागितले मुख्याध्यापिकेला पैसे
By admin | Updated: February 4, 2015 23:19 IST