पुलगावातील प्रकार : भाजप पदाधिकाऱ्यांचा झाला भ्रमनिरासवर्धा : विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारी पार पडली़ यात देवळी-पुलगाव विधानसभा मतदार संघातील निवडणूक अत्यंत चुरशीची ठरली़ मतमोजणीच्या १८ व्या फेरीत भाजपचे सुरेश वाघमारेंना ४ हजारांची आघाडी मिळाली़ यामुळे विजय निश्चित समजून पुलगाव शहरात भाजप पदाधिकाऱ्यांनी निकालाचीही प्रतीक्षा न करता गुलाल उधळण केली़ अखेरच्या फेरीनंतर पराजय झाल्याची वार्ता कळताच त्यांचा भ्रमनिरास झाला़देवळी मतदार संघामध्ये भाजप आणि काँगे्रसमध्ये काट्याची लढत झाली़ पहिल्या फेरीपासून भाजपचे सुरेश वाघमारे मतांची आघाडी घेऊन होते़ १८ व्या फेरीत ही आघाडी ४ हजार मतांवर पोहोचली़ यामुळे विजय निश्चित आहे, असे समज करून घेत भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोषाची तयारी केली़ पूढील फेऱ्यांची प्रतीक्षा न करताच गुलाल उधळण्यात आला़ ढोल-ताशेही सज्ज करण्यात आले होते़ शिवाय वाघमारे यांच्या येथील घरासमोरही जल्लोषाची तयारी पूर्ण झाली होती़ यानंतर २० व्या फेरीपासून भाजपाची मतांची आघाडी कमी करीत काँगे्रस उमेदवाराने विजयी वाटचाल केली़ अखेरच्या २४ व्या फेरीत ९४३ मतांनी रणजीत कांबळे यांना विजयी घोषित करण्यात आले़ यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांचा भ्रमनिरास झाला़ काँगे्रसच्या विजयाची वार्ता पसरताच पुलगाव शहरात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला़ शहरातील टिळक चौक, आर्वी नाका व अन्य परिसरात आतषबाजी करण्यात आली़ आधी भाजप व नंतर काँगे्रस कार्यकर्त्यांनी विजय साजरा केल्यामुळे नागरिकांत संभ्रम निर्माण झाला होता़(कार्यालय प्रतिनिधी)
निकालापूर्वीच उधळला गुलाल
By admin | Updated: October 21, 2014 22:57 IST