आॅनलाईन लोकमत
वर्धा : कोळसा घेऊन नागपूर येथून भुसावळकडे जाणाऱ्या मालगाडीच्या गार्डचा डबा रुळावरून घसरला. ही बाब गार्डसह चालकाच्या लक्षात येऊन कार्यवाही होईपर्यंत डबा सुमारे एक किलोमीटर घासत गेला. यात रेल्वे रूळाचे नट व स्लीपर तुटल्याने नागपूर - मुंबई मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. हा प्रकार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास पुलगाव रेल्वे स्थानकाजवळ घडला. घटनेची माहिती रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांना मिळताच सुमारे ८० कर्मचाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. कर्मचाऱ्यांना दुरूस्ती करण्याकरिता सुमारे चार तासांचा कालावधी लागला. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. या घटनेत वर्धा नदीवर असलेल्या पुलावरील रेल्वे रुळाचे नट तुटल्याने चांगलीच तारांबळ उडाली. हा प्रकार लवकरच लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली.