तालुका ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदनवर्धा : देवळी येथे भरसभेत ग्रामसेवकाला मारहाण केल्याप्रकरणी ग्रामसेवक संघटनेने मोर्चा काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर बुधवारी दुपारी धडक दिली. यावेळी तलाठी सराफ यांच्यावर तात्काळ निलंबानाची कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले.तहसील कार्यालय, देवळी येथे मंगळवारी १६ जून रोजी बीएलओ यांची सभा आयोजित करण्यात आली होती. सभा सुरू असताना उपस्थिती स्वाक्षरी नोंदवहीत स्वाक्षरी करण्यावरून शाब्दिक वाद झाला. यावेळी यशवंत गणपतराव निमजे यांना तलाठी सराफ यांनी भरसभेत मारहाण केली. या घटनेचा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने निषेध नोंदविण्यात आला. तलाठी सराफ यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, जोपर्यंत त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत बीएलओचे कुठलेही काम करण्यात येणार नसल्याची भूमिका ग्रामसेवकांनी निवेदनातून घेतली. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतेवेळी ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष कुंदन वाघमारे, जिल्हा सरचिटणीस प्रमोद बिडवाईक, तालुका संघटनेचे अध्यक्ष पी.आर. राऊत, उपाध्यक्ष राठोड, येवतकर, निमजे, धावडे, होले, चोकसकर, मनभे, चव्हाण, पाणबुडे, जुमडे, आघाव, चटप, लोखंडे, रूद्रकार, मून, गवई, जाधव, वानखेडे, राऊत, कुकडे, घोडे यांच्यासह शेकडो ग्रामसेवक उपस्थित होते. निवेदनाची प्रत महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना पाठविण्यात आली आहे.(शहर प्रतिनिधी)तलाठी सराफ यांच्यावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात यावी असे न केल्यास तालुकास्तरावर होणाऱ्या संयुक्तीक सभांवर बहिष्कार घातला जाईल.प्रमोद बिडवाईकजिल्हा सरचिटणीस, ग्रामसेवक संघटनाभर सभेत घडलेले कृत्य अशोभनीय असेच आहे. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून तलाठ्यावर कारवाई केली जाईल. आशुतोष सलील, जिल्हाधिकारी, वर्धा
तलाठ्याच्या निलंबनाकरिता ग्रामसेवकांचा मोर्चा
By admin | Updated: June 18, 2015 01:40 IST