समुद्रपूर: तालुक्यामध्ये १० ग्रामपंचायतीमध्ये २५ जुलै रोजी सार्वत्रिक निवडणुका होत आहे. विशेष म्हणजे यंदा ग्रामपंचायत नामनिर्देशन पत्र भरण्याची प्रक्रिया आॅनलाईन करण्यात आल्याची माहिती समुद्रपूरचे तहसीलदार यादव यांनी दिली.समुद्रपूर तालुक्यामध्ये २५ जुलैला कोरा, मंगरूळ, चिखली, मोहगाव, सावंगी झाडे, करूर (पवनगाव), नारायणपूर (झो.), सुजातपूर, हिवरा, हळदगाव या १० ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत आहे. या निवडणुकीकरिता राज्य निवडणूक आयोगाने महाआॅनलाईनच्या मदतीने नामनिर्देशन पत्र आॅनलाईन भरावयाचे सॉफ्टवेअर तयार केलेले आहे. या सॉफ्टवेअरच्या साह्य्याने आपले नामदनिर्देशन पत्र आॅनलाईन भरावयाचे आहे. सदर सॉफ्टवेअर संग्राम केंद्र व महा ई-सेवा केंद्रमध्ये उपलब्ध आहे. सर्व कागदपत्रासह केंद्रावर जाऊन नामनिर्देशन पत्राचा नमुना भरून त्यांचे प्रिंट आऊट घेवून त्यावर उमेदवाराला स्वाक्षरी करावी लागेल व असे प्रिंटआऊट निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे विहित वेळेत १० जुलैपर्यंत सादर करावे लागणार आहे. त्याचप्रमाणे राखीव जागेकरिता निवडणूक लढविण्यास इच्छूक असलेल्या उमेदवारांनी जातीचे प्रमाणपत्र व जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असून जात वैधता प्रमाणपत्र नसल्यास प्रकरण जात वैधता समितीकडे सादर केल्याची पोच पावती व निवडून आल्यापासून सहा महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याचे हमीपत्र सादर करावे लागणार आहे. सोबतच त्याच्यावर कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. सदर प्रकिया नवीन असल्याने ग्रामीण भागातील जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता तहसील कार्यालयाकडून घेतली जात आहे. याकरिता तहसीलदार यादव निवडणूक नायब तहसीलदार शंभरकर प्रयत्नशील आहे.(तालुका प्रतिनिधी)
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया आता आॅनलाईन
By admin | Updated: July 5, 2015 01:27 IST