श्रेया केने । लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्ती निवारणार्थ यंत्रणा सुसज्ज झालीआहे. जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात नुकतीच आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्ह्यात नैसर्गिक किंवा इतर कोणत्याही प्रकारची आपत्ती आल्यास कोणत्या उपाययोजना कराव्यात यावर विचारविमर्श करून कार्याचे वाटप कर्मचारी व अधिकाऱ्यांना केले आहे. यानंतर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देऊन यंत्रसामुग्रीच्या वापराबाबत प्रात्यक्षिक करण्यात आले.. त्यामुळे पावसाळ्यात उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. नैसर्गिक आपत्तीतून नागरिकांचा बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने आवश्यक साधनांची खरेदी यापूर्वीच केली आहे. यात लाईफ पॅकेट, मेगा फोन, फोल्डींग स्ट्रेचर, रोप अॅन्ड रेस्क्यु किट, सर्च लाईट, लाईफ बॉईज, प्रथमोपचार किट, शोध व बचाव गॉगल्स, टेन्ट गमबूट ड्रम, जिपचे ट्युब, पोर्टेबल इमरजन्सी लाईट या साहित्याचा समावेश आहे. यातील प्रत्येक साहित्याचे वितरण तालुकानिहाय करण्यात आले आहे. आपत्ती व्यवस्थापन आले आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अधिनियम २००६ अंतर्गत आपत्ती निवारणाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. तसेच मान्सून कालावधीत पूर्व परवानगीशिवाय जबाबदारी दिलेल्या अधिकाऱ्यांना मुख्यालय सोडता येणार नाही, असे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. कार्यशाळेतून मार्गदर्शन व प्रात्यक्षिक साहित्य खरेदीकरिता २०१३-१४ मध्ये आपत्ती व्यवस्थापनाकडून निधी आला होता. यामध्ये सदर साहित्याची खरेदी केली. मात्र या साहित्याची हाताळणी कशी करावी याची माहिती प्रशासनातील कर्मचारी व अधिकारी वर्गाला नसल्याने सदर साहित्य कुचकामी ठरत होते. यावर्षी जिल्हा प्रशासनाने अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण दिले. याबाबत मे महिन्यात झालेल्या सभेनंतर आराखडा तयार करण्यात आला. तालुकानिहाय मंडळ अधिकारी, तलाठी, कोतवाल, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी तसेच कर्तव्यावर नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. आपत्तीच्या स्थितीत नागरिकांचा बचाव कसा करावा याचे प्रात्यक्षिक दिले. सर्व विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची कार्यशाळा घेऊन समुपदेशन करण्यात आले. एक बोट नादुरुस्त पूर परिस्थितीचा सामना करण्यासाठी जिल्ह्यात एकूण ५ बोटी उपलब्ध आहे. यापैकी लालनाला प्रकल्पातील एक बोट नादुरुस्त असून येथील एक फायबर बोट आर्वी उपविभागाला देण्यात आल्याची माहिती आहे. सदर बोटी केंद्र शासनाकडून प्राप्त निधी तसेच स्थानिक आमदार यांच्या निधीतून खरेदी करण्यात आल्या आहे. सद्यस्थितीत मोटरबोट, फायबर बोट, रबर बोट आहेत. पुरस्थितीत नागरिकांची सुटका करण्यासाठी या बोटींचा वापर केल्या जातो. जिल्हा प्रशासनाच्या आराखड्यानुसार प्रकल्पस्थळी तसेच पूरग्रस्त भागात या बोटी ठेवण्यात आल्या आहे. समूदाय आधारित आपत्ती व्यवस्थापन करण्याकडे प्रशासनाचा भर आहे. त्यामुळे आपत्तीचे निवारण ताबडतोब करता येईल. नागरिकांचा सहभाग वाढविण्याचा प्रयत्न असून गावपातळीवर स्वयंसेवकांना प्रशिक्षण देणार. - किशोर सोनटक्के, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, वर्धा.
आपत्ती व्यवस्थापनासाठी शासकीय यंत्रणा सज्ज
By admin | Updated: June 22, 2017 00:34 IST