निवेदन सादर : कापूस उत्पादक संघाचे आंदोलन वर्धा : जिल्ह्यामध्ये जवळपास ७५ टक्के जमिनीवर कापसाची लागवड आहे. गत १५ दिवसांपासून शेतकऱ्याच्या कापूस वेचणीस सुरुवात झालेली आहे. असे असताना जिल्ह्यात शासकीय कापूस खरेदी सुरू झाली नाही. ती तत्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणीचे निवेदन कापूस उत्पादक संघाच्यावतीने शुक्रवारी निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावाडकर यांना सादर करण्यात आले. दरम्यान तळेगाव (श्यामजीपंत) येथील एका जिनिंगमध्ये आजपासून शासकीय खरेदीला प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात इतर भागातही केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. शेतकरी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शेतकरी शेती करतो आहे. परंतु कापसाचे उत्पादन सुरू होवून सुद्धा सरकारी यंत्रणा सीसीआय व फेडरेशन द्वारे आधारभूत किमतीनुसार कापसाची खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे खासगी कापूस खरेदीचे व्यापारी आधारभुत किमतीपेक्षा कमी किमतीत कापूस खरेदी करतो आहे. शेतकऱ्यांच्या या समस्यांवर आपण त्वरीत उपाययोजना राबवून शासकीय यंत्रणेद्वारा कापूस खरेदी सुरू करावी, असेही निवेदनात म्हटले आहे. यावेळी मिलिंद हिवलीकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.(प्रतिनिधी) तळेगावात पणन महासंघाची खरेदी सुरू जिल्ह्यात कापूस घरी येणे सुरू झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांकडून व्यापाऱ्यांची कापूस खरेदी सुरू झाली आहे. यात कापसाची आवक वाढल्यास व्यापाऱ्यांकडून दर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे शासकीय खरेदी सुरू करण्याची सर्वत्र मागणी होत होती. यामुळे पणन महासंघाच्यावतीने खरेदी सुरू करण्याचा निर्णय झाला असून तळेगाव (श्यामजीपंत) येथील एमआर जिनिंग अॅण्ड प्रेसिंग येथे शुक्रवारी शासकीय खरेदी सुरू झाली आहे. यात पहिल्यादिवशी दोन क्विंटल कापूसाची खरेदी झाली आहे. यावेळी संचालक वसंतराव कार्लेकर यांच्यासह आष्टी बाजार समितीचे सभत्तपती युवराज ढोले, उपसभापती पांडुरंग हलोंडे यांच्यासह पणन महासंघाचे जिल्हा व्यवस्थापक एस. चर्जन यांची उपस्थिती होती.
शासकीय कापूस खरेदीची मागणी
By admin | Updated: November 7, 2015 02:07 IST