वर्धा : प्लास्टिकचा अतिरेकी वापर होत असल्याने शहरात अस्वच्छता पसरली आहे़ नाल्या तुंबत असून सार्वजनिक आरोग्य धोक्यात आले आहे़ यामुळे नगर विकास विभागाद्वारे नगर पालिकांच्या हद्दीत प्लास्टिक बंदीच्या निर्णयावर कठोर अंमल करण्याचे आदेश देण्यात आले आहे़ यानुसार वर्धा जिल्ह्यातील आर्वी व वर्धा नगर परिषदेने पुढाकार घेत कारवाई केली; पण जिल्ह्यातील चार नगर पालिकांनी अद्याप हे निर्देश गांभीर्याने घेतले नसल्याचेच दिसते़ प्लास्टिकच्या अतिवापरामुळे अस्वच्छता वाढली असून जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे़ शिवाय पर्यावरणाला धोका निर्माण झाल्याने शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकवर बंदी घातली आहे़ राज्यभर ही बंदी लागू असून यापूर्वी सदर आदेशाचे गंभीरतेने पालन झाले नाही़ यामुळे नगर विकास विभागाच्यावतीने या निर्णयावर कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले आहेत़ यामुळे राज्यातील बहुतांश नगर पालिका कामाला लागल्या आहेत़ जिल्ह्यातील वर्धा आणि आर्वी नगर पालिकेनेही सूचना जारी करून नागरिक तसेच व्यापाऱ्यांना ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक आढळून आल्यास कारवाई केली जाईल, असा इशारा दिला़ यानंतर दोन्ही पालिकांनी तत्सम शोध मोहीम राबवून व्यावसायिक व नागरिकांवर कारवाईचा बडगा उगारला़ यात वर्धा शहरात मंगळवारी (दि़४) नगर परिषदेने कारवाई करीत आठ दुकांनावर धाड टाकली़ यात ५०० किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. शिवाय त्यांना दंडही ठोठावण्यात आला़ शासनाच्या निर्देशानुसार पालिका प्रशासनाने कारवाईचा सपाटा सुरू केला आहे़ यात वर्धेत ऩप़ मुख्याधिकारी, नायब तहसीलदार व पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई पार पाडली़ प्लास्टिक विकणाऱ्या व्यावसायिकांना पालिकेने प्रत्येक एक हजार रुपयांचा दंडही ठोठावला़ शिवाय भाजी विक्रीसह अन्य व्यवसाय करणाऱ्या लहान व्यावसायिकांच्या दुकानांचीही झडती घेतली. पालिकेने केवळ धाडच टाकली नाही तर, शासनाने दिलेल्या नवीन नियमांची माहितीही देण्यात आली़ शिवाय ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक वापरल्यास दंडात्मक कारवाईबाबतही माहिती दिली़वर्धा आणि आर्वी नगर परिषद प्रशासनाने कारवाईचा धडाका सुरू केला असताना पुलगाव, देवळी, हिंगणघाट आणि सिंदी (रेल्वे) नगर परिषद प्रशासनाला हा निर्णय निर्णय अधिक गंभीरतेने घेण्याची गरज वाटली नसल्याचेच दिसून येत आहे़ या चार पालिका प्रशासनाने अद्याप तत्सम सूचनाही जारी केल्या नाहीत़ यामुळे त्या-त्या पालिकांच्या हद्दीत ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक थैल्या वापरण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली आहे काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे़ चारही नगर पालिका प्रशासनाने प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे़(कार्यालय प्रतिनिधी)
चार पालिका प्लास्टिकवर गप्पच
By admin | Updated: November 6, 2014 02:04 IST