मागणी : पंतप्रधानांना पाठविले निवेदनवर्धा : देशात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या महाराष्ट्रातील विदर्भात होतात़ त्यातही पॅकेजग्रस्त सहा जिल्हे वर्धा, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, अकोला, वाशीम येथे शेतकरी आत्महत्यांचा वेग अधिक आहे. दरवर्षी या जिल्ह्यांत एक हजारांहून अधिक शेतकरी आत्महत्या करतात़ यामुळे शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी १ हजार ५०० कोटी रुपयांचे पॅकेज द्यावे, अशी मागणी भाजपप्रणित किसान मोर्चाचे प्रशांत इंगळे तिगावकर यांनी केली आहे़ याबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनही पाठविले आहे़
भाजप पदाधिकाऱ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धेला जाहीर सभेसाठी आले असता शेतकरी आत्महत्यांबाबत माहिती दिली होती़ शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीही आपण दिली़ २००६ मध्ये या पॅकेजग्रस्त जिल्ह्यात तत्कालीन प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांना व्याज माफीचे पॅकेज दिले होते; पण मुद्दल तशीच कायम राहिली़ त्यावर गत आठ वर्षांत पुन्हा तेवढेच व्याज झाले आहे. राज्य व केंद्र शासनाला वारंवार सांगूनही विदर्भातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळाली नाही. पॅकेजग्रस्त जिल्ह्यांतील वर्धा व बुलडाणा जिल्हा सहकारी बँकाही डबघाईस आल्या़ शेतकऱ्यांकडे या जिल्ह्यांत किमान १५०० कोटी रुपयांची थकबाकी आहे. कर्ज वसुलीसाठी बँका शेतकऱ्याकडे जात असल्याने शेतकरी आत्महत्या करतात़ नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतमालाला कमी भाव व चुकीचे कृषी धोरण यास कारणीभूत आहे़ जिल्ह्यातील सिंचन ४ टक्के आहे. अशावेळी त्वरित विदर्भातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी त्यांची संपूर्ण कर्ममाफी करण्यात यावी़ यासाठी १५०० कोटी रुपयांचे पॅकेज शासनाने त्वरित मंजूर करावे व शेतकऱ्यांना सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी निवेदनातून केली़(कार्यालय प्रतिनिधी)