लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणघाट : तालुक्यातील सावली (वाघ) येथे गॅस सिलिंडरचा भडका उडून लागलेल्या आगीत कष्टकऱ्यांच्या पाच झोपड्या जळून खाक झाल्या. ही घटना बुधवारी सकाळी घडली असून यात सुमारे पाच लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले.बुधवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सावली (वाघ) गावातील झोपडपट्टीतील तुकाराम नांदे यांच्या झोपडीत जेवण तयार करणे सुरू असताना घरगुती गॅस सिलिंडरने पेट घेत आगीचा अचानक भडका उडाला. गॅस सिलिंडरने पेट घेतल्याचे लक्षात येताच झोपड्यांमधील नागिरकांनी घराबाहेर पळ काढला. पण, अचानक आगीचा भडका उडाल्याने बघताबघता पाच झोपड्यांना आगीने आपल्या कवेत घेतले. दरम्यान, हिंगणघाट येथील अग्निशमन विभागाला घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच हिंगणघाट नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठले. घटनास्थळी पोहोचलेल्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी आगीवर पाण्याचा मारा करून परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने मोठी दुर्घटना टळली.
संसारोपयोगी साहित्याचा कोळसागॅस सिलिंडरचा भडका उडत लागलेल्या आगीत पाच झोपट्यांमधील अन्न-धान्यांसह कपडे आदी संसारोपयोगी साहित्य जळून कोळसा झाल्याने संसार उघड्यावर आलेल्या पाचही व्यक्तींचे मोठे नुकसान झाले आहे.
अन् संसार आला उघड्यावर - अचानक लागलेल्या आगीत तुकाराम नांदे, माँझिपुडा समर, ऋषी मगरे, मधुकर बोडखे, आशा दोडके यांची झोपडी पूर्णपणे जळून कोळसा झाली. त्यामुळे या पाचही व्यक्तींचा संसार उघड्यावरच आला आहे.
नायब तहसीलदार पोहोचले घटनास्थळी- आग लागल्याची माहिती मिळताच हिंगणघाट येथील नायब तहसीलदार समशेर खान पठाण, मंडळ अधिकारी प्रशांत निनावे, तलाठी प्रसाद पाचखेडे, पोलीस पाटील विशाल ढेंगळे, कोतवाल प्रकाश निमसरकर, ग्रामसेवक पोहणे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ठाकूर यांनी तातडीने घटनास्थळ गाठून पाहणी केली.
दोन तासांच्या प्रयत्नांती परिस्थितीवर नियंत्रण- माहिती मिळताच हिंगणघाट नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी अग्निशमन बंबासह घटनास्थळ गाठले. - परिसरातील नागरिकांच्या मदतीने तब्बल दोन तास शर्तीचे प्रयत्न केल्यावर परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.- परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळाल्याने पुढील अनर्थ टळला.
रोख रक्कमही झाली जळून खाक
- अचानक लागलेल्या आगीत पाचही झोपड्यांमधील संसाराेपयोगी विविध साहित्यांसह रोख रक्कमही जळून कोळसा झाली आहे. त्यामुळे आता पुढे काय, असा प्रश्न या नुकसानग्रस्त कुटुंबीयांसमोर आहे.