समुद्रपूर: दोन दिवसांअगोदर कृषिपंप चोरणारी टोळी गजाआड करण्यात आली. हे चोरटे हाती येताच याच भागातील स्प्रिंकलरचे सेट चोरणारे चोरटेही गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. शेतातून पितळचे स्प्रिंकलर नोझल लंपास करणाऱ्या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेत असलेल्यांची नावे गजानन कुमरे, रोशन धुर्वे व राजू महाकाळे तिघेही राहणार कवठा असे असल्याचे पोलिसांनी सांगितले. समुद्रपूर पोलीस ठाण्यांतर्गत अंदोरी व कवठा शिवारात कृषी पंप व स्प्रिंकलर संच चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. तशा तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. त्यानुसार ठाणेदार अनिल जिट्टावार यांनी तपास करीत कृषिपंप चोरणाऱ्या टोळीला गजाआड करून स्प्रिंकलर सेट चोरणाऱ्या टोळीकडे लक्ष केंद्रीत केले. समुद्रपूर तालुक्यातील कवठा येथील गजानन संभाजी कुमरे (२६), रोशन किसना धुर्वे (१९), राजू दिलीप महाकाळे (१८) तिघांनाही ताब्यात घेवून सखोल चौकशी केली असता त्यांनी स्प्रिंकलर संच चोरल्याची कबुली दिली. त्यांना अटक करून त्यांच्याकडे दोन चोरीतील स्प्रिंकलर संच जप्त करण्यात आले. ही कारवाई ठाणेदार अनिल जिट्टावार यांच्यासह उपनिरीक्षक राहुल जंजाळ, उमेश हरणखेडे, बोंडसे, जमादार चांगदेव बुरंगे, प्रकाश मैद, सुरेश मडावी, विनायक गोडे, रमेश पाटील यांनी केली.(तालुका प्रतिनिधी)
स्प्रिंकलर संच चोरणारी टोळी गजाआड
By admin | Updated: November 4, 2014 22:45 IST