लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पोळा सण अगदी सहा दिवसांवर येऊन ठेपला आहे. शहरी व ग्रामीण भागात जुगाऱ्यांचा ‘पोळा’ भरत आहे. विविध ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. मात्र, तरीही नाममात्र कारवाई करण्यावरच पोलिसांचा जोर दिसून येत आहे. पोळा शेतकऱ्यांचा सण असला, तरी त्या पार्श्वभूमीवर जुगाराला अक्षरश: उधाण येते. गावागावांत जुगार खेळला जातो. हायप्राेफाइल जुगारअड्डे वर्षभर चालतात. आता सुरू असलेल्या जुगारावर लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. पोलिसांचा ससेमिरा चुकविण्यासाठी जीर्ण घर, सामसूम शेतशिवारात जुगाऱ्यांचा वावर वाढत चालला आहे. तीन पत्तींचा एक डाव हजारोंचा राहत आहे. नुकताच आर्वी, शहर, रामनगर पोलिसांनी जुगार अड्ड्यांवर छापे मारून हजारोंची रक्कम जप्त केली. ग्रामीण पोलिसांकडूनही छापेमारी केली जात आहे. रोकड जास्त असताना, नाममात्र दोन हजारांच्या आतच रक्कम दाखविल्या जात असल्याचे चित्र आहे.शहरात काही पॉश घरात जुगार खेळला जात आहे. येथे प्रतिष्ठांचा वावर दिवसरात्र आहे. पोलिसांना याबाबत माहिती असूनही छापेमारी केली जात नाही, हा मोठा प्रश्न आहे. लहान जुगारांवर किरकोळ कारवाई केली जाते. सेलू येथील काही आलीशान घरांतही नागपूर येथील काही जुगारी महागड्या वाहनांनी जुगार खेळण्यास येतात. याबाबत पोलिसांना माहिती असतानाही त्यांच्याकडून कारवाई करण्यास टाळाटाळ केल्या जात असल्याचे परिसरातील नागरिकांकडून बोलल्या जात आहे.
प्रतिष्ठित कर्जबाजारी हायप्राेफाइल जुगार अड्ड्यावर जाऊन खेळणारे अनेक प्रतिष्ठित कर्जबाजारी झालेले आहेत. नशीब साथ देईल, म्हणून व्याजाने पैसा आणला जात आहे. जुगारात खेळलेली रक्कम परत काढण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे. मात्र, कर्जाचा डोंगर वाढत चालल्याने, अनेकांवर मालमत्ता विक्रीची वेळ आली आहे.
सोशल क्लबचा आडोसा सोशल क्लबचा आडोसा घेऊन जिल्हा व परप्रांतातील व्यक्तींनी अड्डे सुरू केलेले आहेत. येथे सर्वच प्रकारच्या सुविधा मिळत असल्याने, जुगार खेळणारे सोशल क्लबला पसंती देत आहेत. दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल असताना, अलीकडच्या दिवसांत पोलिसांनी छापेमारी केल्याचे दिसत नाही.