जि.प. शाळेतील लॅपटॉप चोरी प्रकरणवायगाव (नि.) : येथील जि.प. शाळेतून लॅपटॉप चोरी झाला होता. याप्रकरणी पोलिसांनी मंगळवारी दोघांना अटक केली. हे दोघेही डी.एड.चे विद्यार्थी असल्याची माहिती समोर आली आहे. अध्यापक विद्यालयाचे विद्यार्थी शाळेत सरावपाठ घेण्यासाठी गेले होते. देवळी पोलीस ठाण्यात १३ जानेवारी रोजी लक्ष्मी मसराम यांनी शाळेतील १२ हजार रुपये किमतीचा लॅपटॉप अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची तक्रार दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात तपास करण्यात आला. अध्यापक विद्यालयाचे डी.एड. अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आकाश ज्ञानेश्वर बगवे रा. अल्लीपूर व कौस्तुभ संजय वानकर रा. हिंगणघाट यांनी चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून लॅपटॉप हस्तगत करण्यात आला. प्रकरणाचा तपास व्ही.एस. खेकडे, गजानन राऊत, श्रावण ठाकरे, पवन बाभूळकर, सतीश वलके, सुधीर उईके, मीनाक्षी चव्हाण यांनी केला.(वार्ताहर)
भावी शिक्षकच निघाले चोर
By admin | Updated: February 25, 2016 02:04 IST