लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : केंद्र व राज्य शासनाच्या वतीने महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. जिल्ह्यातील बचत गटांच्या सक्षमीकरणाकरिता ३९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. यामध्ये आणखी विशेष वर्धा जिल्ह्यासाठी १० कोटी १६ लाख रुपयांचा निधी मंजूर करून बचत गटांना वितरण करण्यात आला आहे. या निधीतून बचत गटांनी उत्तम दर्जाच्या वस्तू उत्पादित कराव्या, असे आवाहन गृहनिर्माण, गृह (ग्रामीण), शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी केले.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रण व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने सर्कस मैदान येथे २२ ते २५ मार्च या कालावधीत जिल्हास्तरीय प्रदर्शनी व विक्री वर्धिनी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे आज उदघाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, जिल्हा ग्रामिण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक सूरज गोहाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक सुशांत पाटील, माजी नगराध्यक्ष प्रदीपसिंह ठाकुर, वंदना भूते, नीता सूर्यवंशी, आशिष कुचेवार, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियानचे व्यवस्थापक निरज नखाते, अपूर्व पिरके आदी मंचावर उपस्थित होते.
पालकमंत्र्यांच्या हस्ते महिला बचत गटांना १० कोटी १६ लक्ष रुपयांच्या धनादेशाचे महिला बचत गट प्रभाग संघांना वितरण, तसेच कार्यक्रमासाठी भेट वस्तू म्हणून देण्यासाठी सौंदर्य वर्धिनी बास्केट, अनावरण करण्यात आले.
स्पर्धेत टिकण्यासाठी वस्तूची पॅकेजिंग महत्त्वाचीबाजारपेठेत स्पर्धेचे युग असून, कोणत्याही वस्तूला उत्तम दर्जाची पॅकेजिंग असल्यास उत्पादनाला चांगला भाव मिळू शकतो. यासाठी ४५ लाख रुपयांच्या निधीतून बचत गटांना पॅकेजिंग मशिन उपलब्ध करून देण्यात आल्या आहे. या मशिनचा चांगला उपयोग करून वस्तूचे उत्तम दजाचे पॅकेजिंग केल्यास वस्तूला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळून बचत गट सक्षम करण्यास मदत होईल, असे पालकमंत्री म्हणाले.
फुलांचे बुकेऐवजी भेट म्हणून बास्केट द्याविविध कार्यक्रमांत मान्यवरांना भेट वस्तू म्हणून फुलांचा बुके देण्याची प्रथा रुढ झाली आहे. या फुलांच्या बुकेऐवजी बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंच्या बास्केट देऊन स्वागत करण्यासाठी खरेदी करावे, तसेच महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू नागरिकांनी खरेदी कराव्या, असे आवाहन डॉ. पंकज भोयर यांनी उपस्थितांना केले आहे.
बचत गटांनी कर्जाची परतफेड वेळेवर करावीकोणताही उद्योग, व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांमध्ये इच्छाशक्ती, ज्ञानशक्ती व कर्मशक्ती हे गुण अंगी असणे आवश्यक आहे. यावर्षी प्राप्त असलेल्या २७५ कोटी बॅकलिकेज लक्ष्यांकापेक्षा ३८८ कोटींचे कर्जाचे लक्ष्यांक महिला बचत गटांनी पूर्ण केले असून, गटांनी कर्जाची परतफेड नियमित करावी, असे आवाहन जितीन रहेमान यांनी केले.