आरोपी अज्ञात : डोक्यावर शस्त्राचे वार आर्वी : दसऱ्याच्या रात्रीला येथील देऊरवाडा मार्गावरील शासकीय धान्यपुरवठा विभागाच्या गोदामाच्या मागे इसमाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळल्याने शहरात चांगलीच खळबळ माजली. ही घटना शुक्रवारी सकाळी उघड झाली. सुरेश विष्णू मोहोड (४०) रा. स्टेशन वॉर्ड असे मृतकाचे नाव आहे. त्याची हत्या करून तो मृतदेह येथे आणून टाकल्याची शक्यता वर्तविली जात आहे. मृतकाच्या डोक्यावर मागच्या बाजूस धारदार शस्त्राची जखम आहे. शिवाय मृतदेहापासून काही अंतरावर रक्ताचे डाग असून मृतकाच्या चपला आढळून आल्या आहेत. यावरुन त्याची हत्या करून पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशाने येथे मृतदेह आणून टाकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूद्ध हत्येचा गुन्हा नोंद केला असून तपास सुरू आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, येथील अन्नपुरवठा विभागाच्या शासकीय गोदामाच्या मागे मृतदेह आढळल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून घटनास्थळ गाठून पाहणी केली असता मृतदेह येथील सुरेश मोहोड याचा असल्याची ओळख पटली. सुरेश याची हत्या करून पुरावा नष्ट करण्याकरिता त्याचा मृतदेह ओढत येथे आणून कचऱ्यात टाकण्यात आल्याचे दिसून आले. सुरेश हा हमालीचे काम करणारा आहे. गुरुवारी दसरा असल्याने तो सायंकाळी त्याच्या घरून निघाल्याची माहिती आहे. रात्री ८ वाजताच्या सुमारास तो त्याच्या काही मित्रांना देऊरवाडा मार्गावरील शीतला माता मंदिरासमोर बसलेला आढळून आला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. घटनास्थळी त्याची कुणाशी तरी झटापट झाल्याचे दिसून आले. त्याची झालेले झटापट कुणाशी व कशासाठी याचा शोध पोलीस घेत आहे. एवढ्या रात्री या अंधाऱ्या गल्लीत तो कसा पोहोचला, या घटनेचा तपास पोलीस करीत आहे. मृतकाचा विवाह झाला असून तो त्याच्या म्हाताऱ्या आईसह राहत होता. घटनास्थळावरून काही अंतरावर मृतकाच्या दोन्ही चपला व दोन ते तीन ठिकाणी रक्ताचे डाग जमिनीवर आढळून आले. त्याला कुणीतरी दुसरीकडे मारून घटनास्थळी आणले. येथे त्यांच्यात बाचाबाची झाली. यातच त्याची हत्या करण्यात आली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असता त्याचा कुठलाही सुगावा मिळाला नाही. श्वान पथकाला पाचारण करण्यात आले; मात्र त्याचा कुठलाही लाभ झाला नाही. या प्रकरणाचा तपास सुरू असून मारेकरी लवकरच हाती येतील असा अंदाज पोलिसांचा आहे.तपासाकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहेत.(तालुका प्रतिनिधी) घटनेचे रहस्य कायमयेथील शासकीय गोदामाच्या मागच्या बाजूस आढळलेला मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत असल्याचे शवविच्छेदनाच्या वेळी दिसून आले. हत्या करून पुरावा नष्ट करण्याकरिता मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. त्याची हत्या करून जाळले वा जिवंतच जाळले याचा शवविच्छेदनानंतर खुलासा होईल. मृतदेह ओढत आणल्याच्या खुणामृतदेह ज्या ठिकाणी सापडला त्या ठिकाणापर्यंत तो ओढत आणल्याच्या खुणा दिसून आल्या आहेत. यामुळे हत्या करून मृतदेह येथे आणून टाकल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे; मात्र मारेकरी एक होता की अधिक याचा कुठलाही सुगावा येथे दिसून आला नाही. यामुळे अद्याप पोलिसांच्या तपासाची दिशा ठरली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
अर्धवट जळालेल्या मृतदेहाने खळबळ
By admin | Updated: October 24, 2015 02:02 IST