सावंगी मेघे रुग्णालयात पहिली लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया; आनंदची झाली 'राजराजेश्वरी' 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2021 09:37 PM2021-08-12T21:37:07+5:302021-08-12T21:37:30+5:30

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील आनंद (३१ वर्षे) या व्यक्तीवर सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात प्रथमच लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यात आली.

First transplant surgery at Sawangi Meghe Hospital; 'Rajarajeshwari' is happy | सावंगी मेघे रुग्णालयात पहिली लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया; आनंदची झाली 'राजराजेश्वरी' 

सावंगी मेघे रुग्णालयात पहिली लिंगपरिवर्तन शस्त्रक्रिया; आनंदची झाली 'राजराजेश्वरी' 

googlenewsNext

वर्धा - आपण दुसऱ्याच शरीरात जन्म घेतल्याची वेदना मला कळायला लागले त्या वयापासून सोसत होते. हे पुरुषी शरीर आपले नाही, याची जाणीव बालवयातच झाली होती. माझे मुलींसारखे वागणे घरीदारी सर्वांना खटकत होते, पण समजून कोणीच घेत नव्हते. अखेर घर सोडले आणि धर्मस्थळांचा आधार घेतला. सज्ञान झाल्यावर सामाजिक कार्यकर्त्यांच्या सान्निध्यात आले. वयाच्या तिशीनंतर मार्गदर्शक मिळाले. सावंगी मेघे रुग्णालयात योग्य उपचार मिळाले आणि एका शस्त्रक्रियेने मला माझी ओळख दिली. मी एका जन्मातून मुक्त होऊन माझ्या मूळ रूपात आले आहे, याचा आनंद शब्दात व्यक्त करू शकत नाही, हे जाहीर उद्गार आहेत लिंगबदल शस्त्रक्रियेने आनंदची राजराजेश्वरी झालेल्या तरुणीचे.  

नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथील आनंद (३१ वर्षे) या व्यक्तीवर सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयात प्रथमच लिंगबदल शस्त्रक्रिया करण्यात आली. समाजात सकारात्मक संदेश जावा या उद्देशाने राजराजेश्वरी हे नवे नाव धारण करीत तिने माध्यमांशी संवाद साधला. राजराजेश्वरी म्हणाली, लहानपणापासून अनेक कटू अनुभव वाट्याला आले. पालक आजही आपल्या अपत्यांच्या नैसर्गिक शारीरिक बदलांना स्वीकारायला तयार नाहीत. समाज त्यांना हिजडा, छक्का, समलिंगी अशी चुकीची विशेषणे लावत राहतो. मात्र ही मुले तृतीयपंथी नसतात. पुरुषाच्या शरीरात जन्माला आलेल्या त्या मुली असतात. अनेक मुलांना आपण मुलगी असल्याची जाणीव अगदी लहान वयातच होत असते. ही मुले पालकांना सांगण्याचा प्रयत्नही करीत असतात. मात्र पालकांची प्रतिष्ठा आडवी येत असल्याने दुर्लक्ष केले जाते.

लग्नानंतर आपला मुलगा सुधारेल या खोट्या आशेने अनेकदा अशा मुलांचे लग्नही लावून दिले जाते. मात्र या लग्नानंतर दोघांच्याही वाट्याला दुःखच येते. अनेक मुले निराश होऊन आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. मी मात्र स्वतःची ओळख स्थापित करण्यासाठी लढायचे ठरवले. नागपुरात दीड वर्षाआधी एक शस्त्रक्रिया केली पण ती फसवी निघाली. केवळ शरीरापासून एक अवयव विलग करण्यात आला. ती माझी ओळख नव्हती. ही ओळख मला शारीरिक बदलांची प्रक्रिया सुरु करून, प्राथमिक शस्त्रक्रिया करून सावंगी मेघे रुग्णालयाने करून दिली आहे, अशी भावना राजराजेश्वरीने यावेळी व्यक्त केली.

शारीरिक बदल असलेल्या मुलींनी मुलांचे कपडे घातले तर समाजात फारसा फरक पडत नाही. मात्र मुलांनी स्त्रीवेष धारण केला तर त्यांना हिणवले जाते, अशी खंत राजराजेश्वरीने व्यक्त केली.  पत्रपरिषदेला शल्यचिकित्सक डॉ. यशवंत लामतुरे, प्लास्टिक सर्जन डॉ. विवेक सुपाहा, मानसोपचार विभाग प्रमुख डॉ. प्रदीप पाटील, जनसंपर्क अधिकारी संजय इंगळे तिगावकर, सामाजिक कार्यकर्त्या सविता पांडे, दीपक ओबेरॉय यांची उपस्थिती होती. 

ही पहिलीच शस्त्रक्रिया - डाॅ. लामतुरे

लिंगपरिवर्तन घडविणाऱ्या व्हजायनोप्लास्टी म्हणजेच सेक्स रिअसायनमेंट शस्त्रक्रिया भारतात केवळ ५१ सुपरस्पेशालिटी रुग्णालयात होत असून मध्यभारतातील ही कदाचित पहिली शस्त्रक्रिया असावी, असे शल्यचिकित्सक डॉ. यशवंत लामतुरे यांनी यावेळी सांगितले. आनंदची राजराजेश्वरी होण्याची ही प्रक्रिया पुढील सहा महिने सुरु राहणार असून येत्या काळात योग्य पद्धतीने हार्मोन्स वाढविणे, चेहऱ्याची जडणघडण करणे, आवाजबदल घडविणे, स्तनांना आकार देणे, स्त्रीलिंगनिर्मिती करणे, आदीबाबतच्या शस्त्रक्रिया टप्प्याटप्याने होणार आहेत, असेही डॉ. लामतुरे यांनी सांगितले. त्यांनी राजराजेश्वरीच्या धाडसाचे यावेळी कौतुक केले. 

अपत्यांमधील नैसर्गिक बदल समजून घ्या - डाॅ. पाटील

बालवयात होणारे शारीरिक नैसर्गिक बदल पालकांनी वेळीच लक्षात घेतले पाहिजे आणि त्यांना सहकार्य केले पाहिजे. अन्यथा ही मुले खचून जातात. समाजाने हिणवले म्हणून मग काही मुले अनिच्छेने तृतीयपंथी होतात, तर काही थेट आत्मघाताचा मार्ग स्वीकारतात. मुलाचे मुलगी होणे यात यात त्याचा दोष नसतो. म्हणूनच हे बदल मोठ्या मनाने स्वीकारून त्यांचे जगणे समाजाने सुसह्य केले पाहिजे, असे डाॅ. प्रदीप पाटील म्हणाले.

या पहिल्या शस्त्रक्रियेत डॉ. लामतुरे यांच्यासह डॉ. विवेक सुपाहा, डॉ. सुहास जाजू, डॉ. शिवांश सिसोदिया, डॉ. किरण मस्तूद, डॉ. अभिषेक चौधरी, बधिरीकरणतज्ज्ञ डॉ. विवेक चकोले, डॉ. नितीन अळसपूरकर, युरॉलॉजिस्ट डॉ. ढोले, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटील, डॉ. अपूर्वा यादव, डॉ. वैशाली सहगल, डॉ. सुरभी मित्रा तसेच परिचारिका वृंदाचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. तर, सावंगी रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव, विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर सहकार्य लाभले.

Web Title: First transplant surgery at Sawangi Meghe Hospital; 'Rajarajeshwari' is happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :docterडॉक्टर